लातूर - अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून ३५ टक्के कमी वजनाचा आणि २५ टक्के कमी खर्चाचा देशातील पहिला पूल लातूर जिल्ह्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्र. ७५२ वर मसलगा येथील नदीवर उभारला आहे. त्याची पाहणी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी गुरुवारी केली. मलेशियन ड्युरा उच्च तंत्रज्ञानाने बनविलेल्या पुलाची लांबी १११ मीटर व रुंदी १६ मीटर आहे. वैशिष्ट्यपूर्ण तंत्रज्ञानाच्या साहाय्याने ५५.५० मीटर लांबीच्या दोन स्पॅनच्या बांधणीतून तयार करण्यात आला आहे.
वजन कमी कसे...या वैशिष्ट्यपूर्ण पुलामध्ये लोखंडी सळयांऐवजी अल्ट्रा हाय परफॉर्मन्स फायबर रेनफोर्स्ड तंत्रज्ञान वापरले आहे. ज्यामध्ये स्टील फायबर असलेले गर्डर वापरले जाते. हे गर्डर वजनाने हलके असल्याने पुलाचे वजन कमी होते. हाताळणी आणि कामही जलदगतीने होते.
पूल गंजरोधक आणि पाणी प्रतिरोधक...नव्या तंत्रज्ञानाचा हा पूल गंजरोधक, कार्बन व पाणी प्रतिरोधक असल्याने जास्त टिकाऊ आहे. पुलाच्या पायाच्या प्रकारानुसार बांधकाम खर्चातही सुमारे २५ टक्क्यांपर्यंत कपात होते.