चंद्रपूर: ‘लोकशाहीवर विश्वास नसणाऱ्या डॉक्टरांनी नक्षली संघटनेत सामील व्हावं, आम्ही त्यांना गोळ्या घालू ’ असं वादग्रस्त वक्तव्य दुसरं-तिसरं कुणी नाही तर खुद्द केंद्रीय गृहराज्यमंत्र्यांनीच केलं आहे. हंसराज अहिर यांनी सोमवारी चंद्रपूर येथे जिल्हा रुग्णालयात बनविण्यात आलेल्या अत्याधुनिक मेडिकल स्टोअरचे उद्घाटन केले.
भारतरत्न माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या वाढदिवसानिमित्त चंद्रपूरमधील सरकारी रुग्णालयातील मेडिकल स्टोअरचं उद्घाटन होतं. पण सुट्टया असल्यामुळे अनेक डॉक्टरांनी कार्यक्रमाला दांडी मारली. हॉस्पीटलमधील अनेक डॉक्टर हे ख्रिसमसच्या सुट्टीवर गेले असल्याचे सांगण्यात आल्यावर हंसराज अहिर चांगलेच संतापले.
उद्घाटन सोहळ्यानंतर ‘एएनआय’ वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार अहिर यांनी दांडी मारणाऱ्या डॉक्टरांवर नाराजी व्यक्त केली. मात्र नाराजी व्यक्त करताना त्यांची जीभ घसरली आणि नवा वाद निर्माण केला. ‘मी जनतेने निवडून दिलेला खासदार असून मी केंद्रीय राज्यमंत्रीपदावर आहे. मी इथे येणार हे माहित असूनही डॉक्टर रजेवर कसे जाऊ शकतात?, त्यांचा लोकशाहीवर विश्वास नसेल तर त्यांनी खुशाल नक्षलवादी संघटनेत भरती व्हावे, आम्ही त्यांना गोळ्या घालू’, असं बेताल वक्तव्य त्यांनी केलं.