पुणे : भावा-बहिणीच्या अतुट नात्याची गुंफण आणखी घट्ट करणारा दिवाळीतील भाऊबीजेचा सण शहरात मंगळवारी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. आयुष्यभर भाऊ म्हणून पाठीशी खंबीरपणे उभा राहीन अशी ग्वाही भावांनी या दिवशी आपल्या लाडक्या बहिणींना दिली. बहिणींनी मोठ्या प्रमाने आपल्या भावांना अभ्यंगस्नान घातले. तर अनेक बहिणींच्या घरी आपल्या भावाला आवडेल अशा मिष्टान्नाची मेजवानी रंगली होती. शिक्षण, नोकरी किंवा लग्नामुळे दुसऱ्या गावी राहणाऱ्या बहिणी खास या सणासाठी माहेरी आल्या होत्या. भांडणांबरोबरच भावा-बहिणीतील प्रेमळ संवाद, एकमेकांविषयी असणारे प्रेम व भेटवस्तूंची देवाणघेवाण अशा वातावरणात हा सण साजरा झाला. भाऊ-बहीण असूनही शिक्षण किंवा नोकरीच्या निमित्ताने परदेशी असणाऱ्या बहीण किंवा भावांनी इंटरनेटच्या माध्यमातून आपल्या नात्याला साज चढविला. काहींनी आपल्या बहिणींसाठी परदेशातून कुरिअरमार्फत भेटवस्तू पाठविल्या. भाऊबीजेला भावाकडून बहिणीला ओवाळणी मिळण्याची पद्धत परंपरेनुसार चालत आली आहे. मात्र आता बहिणींनीही भाऊबीजेनिमित्त आपल्या लाडक्या बंधुरायासाठी भेटवस्तू घेण्याची पद्धत आली आहे. त्यामुळे भावाबरोबरच बहिणींनीही आपल्या भावाला आवडेल अशी भेटवस्तू दिल्याने बाजारात मोठ्या प्रमाणात उलाढाल झाल्याचे चित्र होते. दागिने, घड्याळे, मोबाईल अशा वस्तूंना भेटवस्तू म्हणून मोठी मागणी होती. (प्रतिनिधी)।भाऊरायांनी आपल्या बहिणीच्या आवडीप्रमाणे ओवाळणी म्हणून आणलेली भेटवस्तू स्वीकारताना बहिणींच्या चेहऱ्यावर दिसणारा आनंद बंधूराजांना सुखावून टाकणारा असल्याचे चित्र होते. दिवाळीच्या कित्येक दिवस आधीपासून मुलांची बहिणीला आवडेल अशी भेटवस्तू घेण्यासाठी बाजारात गर्दी होती. याशिवाय भाऊबीजेचा संदेश असणाऱ्या शुभेच्छापत्रांनी दुकाने सजली होती. चॉकलेट, मिठाई आणि फुले देऊनही अनेक भाऊरायांनी आपल्या बहिणींना खूष केले.
गुंफले भावा-बहिणीचे अनोखे नाते
By admin | Published: November 02, 2016 12:46 AM