यदु जोशी ।लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : राज्यातील विविध विकास योजना, लोकाभिमुख कार्यक्रमांमध्ये गुणी तरुणाईचे योगदान घेणारा अनोखा असा मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम अचानक बंद करण्यात आला आहे. त्यामुळे राज्यहितासाठी झोकून देत काम करणाऱ्या तरुणाईला धक्का बसला आहे.गेल्या आठवड्यात या संबंधीचा आदेश काढताना हा कार्यक्रम नव्या स्वरुपात राबविणार असल्याचे कुठेही आदेशात म्हटलेले नाही. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारने हा कार्यक्रम ुगुंडाळल्याचे स्पष्ट झाले आहे.देवेंद्र फडणवीसमुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी कार्यक्रम राबविणे सुरू केले तेव्हा तसे करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य होते. त्यापासून प्रेरणा घेऊन पाच राज्यांनी ती सुरू केली.मुख्यमंत्री फेलोशिपसाठी आॅनलाइन अर्ज करायचा, आॅनलाइन परीक्षा व्हायची. दरवर्षी साडेचार पाच हजार अर्ज यायचे. त्यातून ५० तरुण-तरुणींना फेलोशिप कार्यक्रमात ११ महिन्यांसाठी संधी मिळायची. दरमहा ४० हजार रुपये विद्यावेतन आणि प्रवासखर्चापोटी ५ हजार रुपये दिले जात. इंजिनियर, डॉक्टर, चार्टर्ड अकाऊंटन्ट, वकिलीचा अभ्यासक्रम पूर्ण केलेले २१ ते २६ वर्षांचे तरुण त्यात सहभागी झाले. चार वर्षांत मोठे काम त्यांनी उभे केले.प्रचंड ऊर्जा आणि वेगळे काहीतरी करण्याची ऊर्मी असलेली तरुणाई या मिशनमध्ये चांद्यापासून बांद्यापर्यंत फिरली. आपल्याकडच्या ‘ब्रेन’चा वापर आपल्याच समाजासाठी करून घेणारा तो अभिनव कार्यक्रम होता. असे बरेच तरुण त्यात सहभागी झाले जे चांगल्या पगाराच्या नोकºया सोडून आलेले होते. चमत्कार वाटावा असे काम चार वर्षांत झाले. राज्याची नवीन स्टार्टअप पॉलिसी त्यांनी तयार केली. हँडिक्राफ्ट पॉलिसी, ग्रीन बिल्डिंग पॉलिसीचा मसुदा तयार केला.फडणवीस यांच्या काळात मुख्यमंत्री वॉर रुममधून विविध योजनांवर देखरेख, समन्वयाचे काम तेथून केले जाई. मुख्यमंत्री फेलोंचे त्यात सक्रिय योगदान होते. जलयुक्त शिवार योजना, महत्त्वाच्या पायाभूत सुविधा प्रकल्प, ग्रामविकासासाठी सीएसआर फंडातून उभारलेली योजना, चंद्रपूर जिल्ह्यात महिलांमार्फत चालणारे सेतू केंद्र, शासनाच्या विविध योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सातत्याने पाठपुरावा करण्याचे काम मुख्यमंत्री फेलोजनी केले. प्रख्यात उद्योगपती रतन टाटा, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारेंपासून अनेकांशी संवाद साधण्याची संधी फेलोजना मिळाली आणि त्यातून त्यांच्या सामाजिक जाणिवा समृद्ध झाल्या. प्रशासनाचा कारभार त्यांना जवळून बघता आला. नव्या सरकारच्या आदेशामुळे तरुणाईच्या उत्साहावर पाणी फेरले आहे.कार्यक्रमाच्या समन्वयक व फडणवीस यांच्या कार्यालयातील ओएसडी प्रिया खान यांनी हा कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय अत्यंत दुर्दैवी असल्याचे सांगितले. त्या म्हणाल्या, राजकीय आकसापोटी तो बंद करण्याचा निर्णय वेदनादायी आहे.मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम हा तरुण आणि ताज्या दमाचे युवा निर्णय प्रक्रियेत सहभागी करून घेण्यासाठी राबविलेला होता. पारदर्शी पद्धतीने त्यांची निवड करण्यात यायची. कुठल्याही विचारधारेशी अथवा राजकीय पक्षाशी त्यांचा संबंध नव्हता. गेल्या आठवड्यात शासनाने एक आदेश काढून हा कार्यक्रम बंद केला. अवघ्या तीन महिन्यांतच फेलोजचे कंत्राट संपुष्टात आणून सरकारला समाजात काय संदेश द्यायचा आहे, हे त्यांनाच ठाऊक. पण एका चांगल्या उपक्रमाला महाराष्ट्र मुकला, एवढेच मी म्हणेन.- देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते, विधानसभा.गेल्यावर्षी नोव्हेंबरपासून मी मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रमात सहभागी झाली. त्या माध्यमातूनच मला महत्त्वाकांक्षी अशा राजमाता जिजाऊ मिशनमध्ये काम करण्याची संधी मिळाली. माताबालसंगोपन, त्यांना सकस आहारासह विविध सुविधा पुरविण्यावर भर देणाºया या मिशनमध्ये आम्ही फेलो जीव ओतून काम करीत होतो. ते एक सेवामिशन होते. मात्र, मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रमच रद्द झाल्याने त्या आमच्या मिशनला धक्का बसल्याचे मला दु:ख आहे. उच्चशिक्षित, मोठ्या घरांतील मुलामुलींपासून सामान्य कुटुंबातील तरुणांनी या कार्यक्रमात भारावल्यागत झोकून दिले होते. ते सेवामिशन अचानक बंद करण्याच्या निर्णयाने विकासात योगदान देणारी तरुणाई नाऊमेद झाली आहे.- सलोनी भल्ला,मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रमातील फेलो तरुणी
अनोखा मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम अचानक गुंडाळला
By ऑनलाइन लोकमत | Published: February 09, 2020 4:45 AM