- अनिलकुमार मेहेत्रेपैठण (जि. छत्रपती संभाजीनगर) : तालुक्यातील चोंढाळा गावातील मुला-मुलींचे लग्न गावात लागत नाही. यासाठी गावापासून दोन किलोमीटर अंतरावरील मारुती मंदिर परिसरात जाऊन हा विधी उरकावा लागतो. शिवाय गावातील घरावर दुसरा मजला चढवला जात नाही, झोपण्यासाठी पलंगाचाही वापर केला जात नाही. शेकडो वर्षांची ही परंपरा आजही कायम आहे.
पैठण तालुक्यातील चोंढाळा हे एक हजार लोकवस्तीचे गाव असून, गावात रेणुका देवीचे एक पुरातन मंदिर आहे. रेणुका देवी अविवाहित राहिली आणि तिचा आदर करण्यासाठी किंवा तिचा कोप होऊ नये म्हणून या गावात आजही लग्न लावली जात नाहीत. गावातील मुला-मुलींचे लग्न गावाबाहेर दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या मारुती मंदिराच्या परिसरात लावले जाते. त्यामुळे गावात मारुतीचे मंदिरसुद्धा नाही. विशेष म्हणजे मुलाचे लग्न झाल्यानंतर त्याला पलंग दिला जात नाही.
- रेणुका देवीसोबत एका असुराला लग्न करायचे होते. मात्र, लग्नासाठी रेणुका देवीने त्या असुरासमोर एक अट ठेवली होती. ती म्हणजे गावापासून जवळच असलेल्या गोदावरी नदीचे पात्र वळवून गावात आणायचे आणि तेही एका रात्रीत.- त्यासाठी भले मोठे वऱ्हाड घेऊन आलेला असूर कामाला लागला; पण भीमाने गोदावरी नदीला लाथ मारल्यामुळे असुराला गोदावरी नदीतील पाणी चोंढाळा गावाकडे आणता आले नाही. -शेवटी त्या असुरासह संपूर्ण वऱ्हाडाचे दगडात रूपांतर झाले. त्यामुळेच आजही या गावाच्या परिसरात आश्चर्य वाटावे इतक्या मोठ्या प्रमाणात दगड आहेत.-विहामांडवा येथे विवाहाचे मंडप उभारल्यामुळे त्या गावचे नाव विहामांडवा पडले. शिवाय रेणुका देवीही अविवाहित राहिली. त्यामुळे या गावात आजही लग्न लावली जात नाहीत.