पुणे : नाटक ही जीवनाचे तत्त्वज्ञान सांगणारी अभिजात कला आहे. समकालीन मूल्ये अधोरेखित करणाऱ्या नाटकांमधून सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय प्रवास अनुभवण्याची संधी नाट्यप्रेमींना उपलब्ध झाली आहे. चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शित ‘वाडा चिरेबंदी’ आणि ‘मग्न तळ्याकाठी’ ही दोन नाटके रंगभूमीवर सलग सादर होणार आहेत. ‘वीकेंड थिएटर’ या संकल्पनेंतर्गत द्विनाट्यधारेचा पहिलावहिला प्रयोग रविवारी दि. १२ जून रोजी पुण्यात बालगंधर्व रंगमंदिरात १२ ते ५ या वेळेत सादर होणार आहे.दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी यांनी वीस वर्षांपूर्वी मराठी रंगभूमीवर एक आगळावेगळा प्रयोग केला होता. आंतरराष्ट्रीय कीर्तीचे नाटककार महेश एलकुंचवार यांची ‘वाडा चिरेबंदी’, ‘मग्न तळ्याकाठी’ आणि ‘युगांत’ ही तीन नाटके त्रिनाट्यधारेच्या रूपात रंगभूमीवर आणली होती. सलग आठ तासांचा हा नाट्यानुभव प्रेक्षकांना नाट्यसमृद्ध करणारा होता. ‘वाडा चिरेबंदी’ हे नाटक त्यांनी पुन्हा रंगभूमीवर आणले आणि यशस्वी प्रयोग पार पडले. याच धर्तीवर ‘वाडा चिरेबंदी’, ‘मग्न तळ्याकाठी’ ही दोन नाटके सलग पाहण्याचा नवाकोरा प्रयोग पुणेकर रसिकांना नव्याने अनुभवता येणार आहे, अशी माहिती चंद्रकांत कुलकर्णी यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.ते म्हणाले, ‘‘आजवर रंगभूमीला जिवंत, सांस्कृतिक, अभिरुचीसंपन्न प्रेक्षकांनी उचलून धरले. गेल्या २५-३० वर्षांत रंगभूमीने अनेक स्थित्यंतरे, नवे प्रयोग पाहिले. नाट्यक्षेत्राची अभिरुची जागवणारी प्रायोगिक नाटकांची चळवळच येथे उभी राहिली. नाट्यप्रेमींची आणि कलाकारांची रंगभूमीशी नाळ जोडली गेली आहे. आजकाल मनोरंजनाची अनेक साधने उपलब्ध झाली असली तरी नाटकातील जिवंतपणाची गंमत वेगळीच असते. ‘वाडा चिरेबंदी’वर रसिकांनी भरभरून प्रेम केले. या नाटकाचे आजवर जवळपास १४० प्रयोग झाले आहेत, तर ‘मग्न तळ्याकाठी’ या नाटकाचे ७ प्रयोग झाले. १० वर्षांनंतर कथानकातील पात्रांचे आयुष्य, नातेसंबंध, स्वभाव, समाज यातील बदल, नवीन पात्रांचा प्रवेश याबाबत नाट्यप्रेमींना उत्सुकता आहे. हाच बदल सलग नाट्यानुभवाच्या स्वरूपात पाहण्याची संधी उपलब्ध झाली आहे.’’पुण्यातील पहिला नाट्यानुभव यशस्वी झाल्यास मुंबई आणि इतर मोठ्या शहरांमध्येही हा प्रयोग राबवला जाणार आहे. सुरुवातीला दर महिन्याला एक प्रयोग करण्याचा संस्थेचा मानस आहे. त्यानंतर या प्रयोगांमध्ये वाढ केली जाण्याची शक्यता आहे. नाट्यशास्त्राचे अभ्यासक, जाणकार, विद्यार्थी तसेच प्रेक्षकांसाठी ही मेजवानी असेल, असेही कुलकर्णी यांनी सांगितले. (प्रतिनिधी)>कलाकारांची साथ> जिगिषा आणि अष्टविनायक संस्थांंची निर्मिती असलेल्या या नाटकात निवेदिता सराफ, भारती पाटील, पौैर्णिमा मनोहर, प्रतिमा जोशी, प्रसाद ओक, वैभव मांगले, नेहा जोशी, चिन्मय मांडलेकर, सिद्धार्थ चांदेकर, राजश्री ठाकूर, दीपक कदम आदी कलाकारांनी भूमिका साकारल्या आहेत. छोट्या पडद्यावर तसेच चित्रपटांमध्ये काम करताना त्यांची नाळ रंगभूमीशी जोडली गेली आहे. रंगभूमीची भूक त्यांना शांत बसू देत नव्हती. त्यामुळे व्यस्त वेळापत्रक सांभाळून त्यांनी ‘वीकेंड थिएटर’ या संकल्पनेला दुजोरा दिला आणि उत्तम साथ दिली. इतर कलाकार वगळता चिन्मय, राजश्री आणि सिद्धार्थ यांनी केवळ ‘मग्न तळ्याकाठी’ या नाटकात भूमिका साकारल्या आहेत. त्यामुळे सलग नाट्यानुभवाच्या पहिल्या टप्प्यात त्यांना प्रेक्षकांत बसून ‘वाडा चिरेबंदी’ या नाटकाचा आस्वाद घेता येणार आहे. त्यानंतर ‘मग्न तळ्याकाठी’ सादर करताना त्यांना वेगळी अनुभूती मिळू शकते, असे कुलकर्णी म्हणाले. या नाटकांच्या माध्यमातून व्यथा, वेदना, नातेसंबंधातील गुंतागुंत प्रेक्षकांना स्वत:च्या जीवनानुभवाची झलक दाखवणारी आहे. त्यामुळेच नाटकाच्या अवकाशात दडलेले नाट्य बघण्याची प्रेक्षकांना उत्सुकता असेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
सलग नाट्यानुभवाचा अनोखा अनुभव!
By admin | Published: June 11, 2016 12:57 AM