मविआ'ची एकीची मोट, वंचितचा समावेश; आधी किमान समान कार्यक्रम मग जागावाटप
By ऑनलाइन लोकमत | Published: February 3, 2024 06:54 AM2024-02-03T06:54:23+5:302024-02-03T06:55:21+5:30
Lok sabha Election 2024: वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी शुक्रवारी पार पडलेल्या महाविकास आघाडीच्या तिसऱ्या बैठकीला उपस्थिती लावल्याने महाविकास आघाडीची एकीची मोट बांधली जात असल्याचे चित्र स्पष्ट झाले.
मुंबई - वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी शुक्रवारी पार पडलेल्या महाविकास आघाडीच्या तिसऱ्या बैठकीला उपस्थिती लावल्याने महाविकास आघाडीची एकीची मोट बांधली जात असल्याचे चित्र स्पष्ट झाले. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत वंचितने वेगळी निवडणूक लढवल्याने त्याचा फटका काँग्रेस, राष्ट्रवादीला बसला होता. आता आंबेडकर सोबत आल्याने या दोन्ही पक्षांसह शिवसेना ठाकरे गटानेही सुटकेचा निःश्वास सोडला.
निमंत्रण पत्रावर केवळ राज्यातील नेत्यांच्या स्वाक्षऱ्या असल्याने नाराजी व्यक्त करत जागा वाटपाच्या पहिल्या बैठकीकडे आंबेडकर यांनी पाठ फिरवली होती. त्यानंतर त्यांची नाराजी दूर केल्यानंतर दुसऱ्या बैठकीला त्यांनी प्रतिनिधी पाठवला होता. तर तिसऱ्या बैठकीला ते स्वतः उपस्थित राहिले.
मविआच्या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली. आपण एकत्र राहून काम करायचे आणि एकत्रित निवडणुकीला सामोरे जायचे असल्याचे आमचे ठरले आहे, असे बैठकीनंतर शिवसेनेच्या नेत्यांनी सांगितले.
भाजपचा लोकसभा निवडणुकीत पराभव करण्यासाठी देशभरातील भाजपेतर पक्षांनी 'इंडिया आघाडी' स्थापन केली. मात्र, आता ही आघाडीच शिल्लक राहिलेली नाही, आमचे आता ठरलेले आहे, महाविकास आघाडीची 'इंडिया आघाडी होऊ नये अशी दक्षता घेण्याचे आम्ही ठरवलेले आहे. त्यामुळे ताक जरी असले तरी फुंकून फुंकून प्यायचे, असे मी ठरवलेले आहे.
- अॅड. प्रकाश आंबेडकर, अध्यक्ष, वंचित बहुजन आघाडी
'किमान समान' साठी समितीची स्थापना
मविआचा किमान समान कार्यक्रम तयार करण्यासाठी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या अध्यक्षतेखालील समिती नेमण्यात आली आहे. या समितीमध्ये सर्व घटक पक्षांच्या सदस्यांचा समावेश असेल, आठ दिवसात ही समिती अहवाल सादर करेल व त्यानंतर पुढील आठवड्यात मविआच्या बैठकीत जागा वाटपावर चर्चा होणार आहे.
८ जागांचा तिढा कायम, जागावाटपाला गती?
■ बैठकीत अॅड. आंबेडकर यांनी मांडलेल्या मुद्यांवर चर्चा झाली. किमान समान कार्यक्रमात कोणते मुद्दे असावेत यावर चर्चा झाली, यापूर्वीच्या दोन बैठकांमध्ये राज्यातील लोकसभेच्या ४८ पैकी ४० जागांचे वाटप झाल्याचे समजते. उर्वरित ८ जागांचा तिढा कायम आहे. या जागांमध्ये रामटेक, हिंगोली, वर्धा, भिवंडी, जालना आणि शिर्डी यांचा समावेश आहे. जिथे शिवसेना (ठाकरे गट) आणि काँग्रेस दावा करत आहेत.
याशिवाय काँग्रेस पक्ष मुंबई दक्षिण मध्य मतदारसंघ आणि मुंबई उत्तर- पश्चिमच्या जागा मागत आहे. मात्र २०१९ त्या निवडणुकीत या दोन्ही जागांवर शिवसेना विजयी झाली होती. त्यामुळे ठाकरे गट दोन्ही जागा सोडण्यास तयार नाही. शुक्रवारच्या बैठकीतही यावर निर्णय झाला नाही. वंचित बहुजन आघाडीच्या आणि राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी पक्षाला शिवसेनेच्या कोट्यातून जागा दिल्या जाणार आहेत. सध्या वंचितला अकोला आणि राजू रोट्टी यांना हातकणंगले या जागा दिल्या जाणार आहेत. मात्र आंबेडकर एका जागेवर समाधानी होणार नसल्याने पुढील बैठकीत सविस्तर चर्चा होणार आहे.