सतीश डोंगरे, नाशिकप्रदीर्घ कालावधीनंतर यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाने नियमित व पूर्णवेळ पीएचडी सुरू केली असून त्यासाठी घेतलेल्या प्रवेश परीक्षेत एका संचालकाने नातेवाईकाच्या लाभासाठी पेपरमध्ये ‘सेटिंग’ केल्याची बाब उघड झाले. त्यामुळे प्रवेश परीक्षेला पुन्हा वादाचे ग्रहण लागण्याची शक्यता आहे.मुक्त विद्यापीठाची पीएचडी याआधीही वादाच्या भोवऱ्यात सापडली होती. विद्यापीठातील काही उच्चपदस्थ अधिकाऱ्यांच्या बोगस पीएचडीचे प्रकरण चांगलेच गाजले होते. मात्र नव्या कुलगुरूंनी पीएचडीत पारदर्शकता आणण्याचे आश्वासन देत पुन्हा एकदा नियमित व पूर्णवेळ अभ्यासक्रम सुरू केला. २१ जुनला विविध विद्या शाखांच्या ४६ जागांसाठी राज्यातील तब्बल एक हजार ४६३ विद्यार्थ्यांनी प्रवेश परीक्षाही (पेट) दिली. मात्र विद्यापीठातीलच एका संचालकाच्या कुटुंबातील सदस्य अव्वल श्रेणीत आल्याने पुन्हा संशयाचे वातावरण आहे. संबंधितांनी शिक्षणशास्त्राच्या प्रश्नपत्रिकेत बदल केल्याची चर्चा आहे. वास्तविक संबंधित संचालकाला प्रवेश परीक्षेच्या प्रश्नपत्रिकांमध्ये हस्तक्षेप करण्याचा कुठलाही अधिकार नाही, तरीही त्याने पदाचा दुरुपयोग केल्याचे विद्यापीठ वर्तुळातच बोलले जात आहे. कुलगुरू डॉ. माणिक साळुंखे यांच्या ही बाब निदर्शनास आल्यानंतर त्यांनी ‘त्या’ संचालकाला चांगलेच खडेबोल सुनावले. तसेच त्यांनी त्याची इतर विभागात तडाकाफडकी बदली केली. मात्र त्याच्यावर गंभीर कारवाई न झाल्याने कुलगुरूंच्या भूमिकेवरही शंका उपस्थित होत आहे.
विद्यापीठ संचालकाचे पेपर ‘सेटिंग’
By admin | Published: July 20, 2015 12:59 AM