मुंबई : आॅगस्ट महिना उजाडल्यावरही मुंबई विद्यापीठातील तब्बल सव्वाचार लाख विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला लागले आहे. आतापर्यंत विद्यापीठाला केवळ १० टक्केच विद्यार्थ्यांचे निकाल जाहीर करण्यात यश आले आहे. त्यामुळे पुढच्या ३ दिवसांत ९० टक्के विद्यार्थ्यांचे निकाल जाहीर करण्याचे आव्हान विद्यापीठासमोर आहे. तरीही विद्यापीठाचा उत्तरपत्रिका तपासणीचा वेग संथच असल्याने दिवसागणिक विद्यार्थ्यांचे टेन्शन वाढत आहे. बुधवार, २ आॅगस्टला सायंकाळपर्यंत फक्त साडेचौदा हजार उत्तरपत्रिकांची तपासणी पूर्ण झाल्याची माहिती विद्यापीठाकडून देण्यात आली.निकालाची डेडलाइन चुकल्यामुळे सव्वाचार लाख विद्यार्थ्यांचे भविष्य टांगणीला लागले आहे.मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या डेडलाइनप्रमाणे ९० टक्के निकाल तीन दिवसांत जाहीर होणार का? अथवा, कुलगुरूंनी सांगितल्यानुसार पुढच्या १३ दिवसांत ९० टक्के विद्यार्थ्यांचे निकाल जाहीर करून विद्यापीठ चमत्कार घडवणार का? याकडे आता सर्वांचे लक्ष लागून राहिलेआहे.२५५ निकाल बाकी-मंगळवारी रात्री उशिरापर्यंत मुंबई विद्यापीठाने १७३ निकाल जाहीर केले होते. बुधवारी विद्यापीठाने ४९ निकाल जाहीर केले आहेत. आतापर्यंत विद्यापीठाने २२२ निकाल जाहीर केले असून, अजूनही २५५ निकाल जाहीर करायचेआहेत.मुंबई विद्यापीठाचे निकालाचे काम पूर्ण झाले नसल्याने, बुधवारीही विद्यार्थी संघटनांनी नारेबाजी करत, कलिना कॅम्पसमध्ये आंदोलने केली. बुधवारी मुंबई काँग्रेसतर्फे निषेध मोर्चा काढण्यात आला. मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या या मोर्चात, कुलगुरू डॉ. संजय देशमुख, शिक्षणमंत्री विनोद तावडे आणि रवींद्र वायकर यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली.अग्रवाल, कीर्ती, सिद्धार्थ, सी.एच.एम. कॉलेजमध्ये विद्यार्थी भारतीने, ‘कुलगुरू चले जाव’ आंदोलन केले. प्रहार विद्यार्थी संघटनेने कुलगुरू डॉ. संजय देशमुख, कुलसचिव डॉ. एम. ए. खान आदींचे मोबाइल क्रमांक, सोशल नेटवर्किंगवर टाकून त्यांना फोन करण्याचे आवाहन विद्यार्थ्यांनी केले.विद्यार्थ्यांसाठी ‘हेल्प डेस्क’-मुंबई विद्यापीठाच्या निकालांना उशीर झाल्यामुळे, अनेक विद्यार्थ्यांचे पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे प्रवेश झालेले नाहीत. परदेशात अथवा अन्य राज्यांत अभ्यासक्रमासाठी जाणाºया विद्यार्थ्यांना निकाल मिळालेला नाही. त्यांना मदत करण्यासाठी विद्यापीठाने ‘हेल्प डेस्क’ सुरू केला आहे.विद्यापीठातर्फे स्थापन करण्यात आलेल्या या कक्षातर्फे विद्यार्थ्यांना प्रवेश घेणे सोपे होणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. ज्या विद्यार्थ्यांना बाहेर प्रवेश घ्यायचा आहे, त्यांनी संचालक, परीक्षा व मूल्यमापन मंडळ, मुंबई विद्यापीठ यांच्या नावाने लेखी अर्ज करावा, असे विद्यापीठातर्फे आवाहन करण्यात आले आहे.विद्यार्थी ज्या परदेशी अथवा अन्य भारतीय विद्यापीठात वा संस्थेत प्रवेश घेणार आहेत, त्याचे निमंत्रण पत्र किंवा प्रवेश मिळत असल्याचे पत्र व तसे सूचित करणाºया पत्राची छायाप्रत अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे. हेल्प डेस्क सुरू केल्यावर २५ विद्यार्थ्यांनी अर्ज पाठविले. यापैकी ५ विद्यार्थ्यांचे निकाल परदेशातील विद्यापीठात पाठवण्यात आले असून ३ निकाल देशातील विद्यापीठांना पाठवण्यात आल्याचे विद्यापीठातर्फे सांगण्यात आले.
विद्यापीठच नापास: सव्वाचार लाख विद्यार्थ्यांचे भविष्य लागले टांगणीला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 03, 2017 4:23 AM