मुंबई : विद्यापीठाची परीक्षा म्हटले की गोंधळ डोळ्यांसमोर येतोच. ही परंपरा विद्यापीठाने यंदाही कायम राखली आहे. हॉलतिकिटांमधील चुका, एकाच दिवशी दोन पेपर, ऐनवेळी बदललेले वेळापत्रक यामुळे विद्यार्थी त्रस्त असतानाच विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने गुरुवारी एमए भाग २च्या विद्यार्थ्यांना चुकीचा पेपर देऊन या गोंधळात आणखी भर टाकली. चुकीचा पेपर देण्यात आल्यानंतर नवीन पेपरसाठी विद्यार्थ्यांना तब्बल तीन तास परीक्षा केंद्रात बसून राहावे लागले.मुंबई विद्यापीठाच्या विविध अभ्यासक्रमांच्या परीक्षा सुरू आहेत. गुरुवारी एमए भाग २च्या पॉलिटिकल सायन्स अभ्यासक्रमाच्या चौथ्या सेमिस्टरचा ‘इंडियन गव्हर्नमेंट अॅण्ड पॉलिटिक्स’ या विषयाचा पेपर होता. कल्याण येथील बिर्ला महाविद्यालयातील २६ विद्यार्थ्यांना साकेत महाविद्यालय परीक्षा केंद्र मिळाले आहे. या केंद्रावर सकाळी ११ ते १ या वेळेत हा पेपर होता. मात्र या विद्यार्थ्यांना एमए भाग १चा पेपर देण्यात आला. विद्यार्थ्यांनी केंद्र प्रमुखांच्या ही चूक निदर्शनास आणून दिली. विद्यापीठाने ही चूक मान्य करीत विद्यार्थ्यांसाठी नवीन पेपर पाठविण्यात आला. विद्यार्थ्यांना पावणेदोन वाजण्याच्या सुमारास नवीन पेपर ई डिलिव्हरीच्या माध्यमातून देण्यात आला. नवीन पेपर देईपर्यंत विद्यार्थ्यांना तब्बल तीन तास परीक्षा केंद्रामध्येच बसून राहावे लागले.पेपर चुकीचा सेट करण्यात आल्याने विद्यार्थ्यांना चुकीचा पेपर देण्यात आला. चुकीचा पेपर देण्यात आल्याचे लक्षात आल्यानंतर योग्य पेपर परीक्षा केंद्राला पाठविण्यात आला. या प्रकरणी संबंधित पेपर सेटरला कारणे दाखवा नोटीस पाठविण्यात येईल, असे परीक्षा नियंत्रक दिनेश भोंडे यांनी सांगितले.वेळापत्रकातील गोंधळ, एकाच दिवशी दोन पेपर असा गोेंधळ सध्या विद्यापीठाकडून सुरू आहे. या गोंधळात विद्यापीठाने आणखी भर टाकली. परीक्षा केंद्रांवर चुकीचा पेपर पाठविणे ही अक्षम्य चूक असून, या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई व्हावी, असे मनविसेचे सिनेट सदस्य सुधाकर तांबोळी यांनी सांगितले.
विद्यापीठाच्या परीक्षेतील गोंधळ सुरूच
By admin | Published: April 24, 2015 1:00 AM