- राहुल शिंदे -
पुणे : सावित्रीबाई फुले पुणेविद्यापीठाने बहि:स्थ अभ्यासक्रम बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतचा ठराव विद्यापीठाच्या नुकत्याच झालेल्या विद्या परिषदेत केला. मात्र, चालू शैक्षणिक वर्षापासून विद्यापीठातर्फे दूर शिक्षण अभ्यासक्रम (डिस्टंन्स लर्निंग एज्युकेशन) सुरू केले जाणार आहेत. त्यामुळे यापुढील काळात विद्यार्थ्यांना विद्यापीठाच्या बहि:स्थ अभ्यासक्रमास प्रवेश दिला जाणार नाही.नोकरी करून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना व गृहिणींना उच्च शिक्षण घेता यावे,या उद्देशाने विद्यापीठातर्फे विद्यार्थ्यांना बहि:स्थ अभ्यासक्रमास प्रवेश दिला जात होता. मात्र, अनेक विद्यार्थी विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयात नियमित प्रवेश न घेता बहि:स्थ अभ्यासक्रमास प्रवेश घेत होते.त्यामुळे काही वर्षांपूर्वी विद्यापीठाने बहिस्थ: अभ्यासक्रम बंद करण्याचा निर्णय घेतला होता.परंतु,या निर्णयाला सर्व क्षेत्रातून विरोध झाल्याने विद्यापीठाला बहि:स्थ अभ्यासक्रम पुन्हा सुरू करावा लागला.मात्र, केवळ सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातच बहि:स्थ अभ्यासक्रमास सुरू असल्याने राज्य भरातील विद्यार्थी या अभ्यासक्रमास प्रवेश घेत होते. त्याचा परिणाम पुणे ,अहमदनगर व नाशिक जिल्ह्यातील विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयातील नियमित जागांच्या प्रवेशावर होत होता.विद्यापीठ प्रशासनाने दूर शिक्षण अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी केंद्रीय मनुष्यबळ मंत्रालयाकडे अनेक वर्ष पाठपुरावा केला होता. परंतु,विद्यापीठाला परवानगी मिळत नव्हती.मात्र, आता दूर शिक्षण अभ्यासक्रम सुरू करण्याच्या धोरणात बदल झाला. नॅककडून ३.५० पेक्षा जास्त गुण मिळालेल्या विद्यापीठांना दूर शिक्षण अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी स्वत:पणे परवानगी घेण्याची आवश्यकता राहिली नाही. त्यामुळे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने चालू शैक्षणिक वर्षापासून दूर शिक्षण अभ्यासक्रम सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे यापूर्वी बहि:स्थ अभ्यासक्रमास प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचेच परीक्षा अर्ज विद्यापीठाकडून स्वीकारले जातील. तसेच याच विद्यार्थ्यांची विद्यापीठाकडून परीक्षा घेतली जाईल.नव्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार नाही.दूर शिक्षण अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यासाठी विद्यापीठाकडून स्वतंत्र पोर्टल तयार केले जात आहे. तसेच येत्या आॅगस्ट महिना अखेरीस किंवा सप्टेबर महिन्यात दूर शिक्षण अभ्यासक्रमाचे प्रवेश सुरू केले जाणार आहेत. त्यासाठी विद्यापीठाकडून दूर शिक्षण केंद्र सुरू केली जाणार आहेत.त्याचप्रमाणे विविध विषयांचे अभ्यास साहित्य तयार करण्याचे काम सुरू आहे.दूर शिक्षण अभ्यासक्रमास प्रवेश घेणाºया विद्यार्थ्यांची संख्या माहिती झाल्यानंतर अभ्यास साहित्य पुस्तिका छपाईसाठी दिल्या जाणार आहेत.विद्यापीठाने बहिस्थ: अभ्यासक्रम बंद केल्यामुळे महाविद्यालयातील नियमित विद्यार्थ्यांच्या प्रवेशाची संख्या वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
.....
* दूर शिक्षण अभ्यासक्रम होणार सुरूविद्यापीठ अनुदान आयोगाच्या निर्देशानुसार सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने चालू शैक्षणिक वर्षापासून दूर शिक्षण अभ्यासक्रम सुरू केले आहेत. या अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी विद्यापीठातर्फे स्वतंत्र पोर्टल तयार केले जात आहे. लवकरच विद्यार्थ्यांना नवीन पोर्टल उपलब्ध करून दिले जाईल. विद्यापीठाच्या विद्या परिषदेमध्ये दूर शिक्षण अभ्यासक्रम यासंदर्भातील निर्णय घेण्यात आला आहे. डॉ.संजीव सोनवणे, प्रमुख, दूर शिक्षण विभाग, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ