मुंबई : मुंबई विद्यापीठाकडून रविवारी पीएचडी (पेट) आणि एलएलएम या दोन अभ्यासक्रमांसाठी प्रवेश परीक्षांचे आयोजन ऑनलाइन पद्धतीने करण्यात आले होते. पेटची वेळ सकाळी साडेदहा ते दुपारी साडेबारा तर एलएलएमची दुपारी ३ ते ४ अशी होती. मात्र, डोंबिवली येथील सुरेखा इन्फोटेक केंद्रावर तांत्रिक बिघाडामुळे पेट दुपारनंतरही सुरू होऊ शकली नाही. परिणामी दुपारच्या सत्रातील एलएलएम प्रवेश पूर्व परीक्षाही झाली नाही.
दोन्ही परीक्षांसाठी मुंबई, पुणे, धुळे, सातारा, नाशिक, सांगली, कोल्हापूर अशा विविध जिल्ह्यांतून आलेल्या विद्यार्थ्यांना परीक्षेविना माघारी परतावे लागले. विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. प्रसाद कारंडे डोंबिवली येथील केंद्रावर विद्यार्थ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागले.
दरम्यान, कांदिवली येथील ठाकूर कॉलेजमध्ये १०:३० वाजताची पेट दुपारी १२:३० वाजता सुरू झाली. या परीक्षेसाठी कोणतीही बैठक व्यवस्था नसल्याने एकाच विषयाचे विद्यार्थी बाजूबाजूला बसले होते, अशी माहिती एका विद्यार्थ्याने दिली. तसेच या विलंबामुळे एलएलएम परीक्षाही उशिराने सुरू झाली. दादर येथील आयईएस राजा शिवाजी विद्यालयात विद्यार्थी अतिरिक्त झाल्याने दुपारी ३ ते ४ आणि सायंकाळी ४ ते ५ अशा दोन सत्रांत एलएलएम परीक्षा घेण्यात आली. डोंबिवली केंद्रावर तांत्रिक कारणामुळे ५२६ विद्यार्थ्यांची पेट, तर ५२४ विद्यार्थ्यांची एलएलएम प्रवेशपूर्व परीक्षा झाली नाही. या विद्यार्थ्यांची परीक्षा २४ नोव्हेंबरला घेतली जाईल. सुधारित प्रवेशपत्र लॉगिन आणि ई-मेलद्वारे कळविले जाईल, अशी माहिती विद्यापीठ प्रशासनाने दिली.