पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रतिपादन : भारतीय विज्ञान परिषदेचे उद्घाटनमुंबई : देशाच्या उद्यमशीलतेला गती मिळावी आणि विद्यार्थ्यांमधील संशोधनवृत्तीला चालना देण्यासाठी विद्यापीठांचा उद्योगांबरोबर समन्वय असणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी केले. वैज्ञानिक प्रकल्पांना निधी देण्याचे प्रस्ताव फार काळ प्रलंबित राहता कामा नये आणि यासाठी वैज्ञानिक विभागांना योग्य अधिकार असले पाहिजेत, असेही पंतप्रधान म्हणाले.मुंबई विद्यापीठाच्या कलिना कॅम्पसमध्ये आयोजित भारतीय विज्ञान परिषदेचे उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी राज्यपाल सी. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञान मंत्री डॉ. हर्षवर्धन, राज्यमंत्री वाय. एस. चौधरी आणि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. राजन वेळुकर आदी मान्यवर उपस्थित होते.भारताच्या समृद्ध भविष्यासाठी आपल्याला विज्ञान, तंत्रज्ञान आणि नवनिर्मिती यांना देशाच्या सर्वाधिक प्राधान्यक्रमाच्या बाबींमध्ये समाविष्ट केले पाहिजे. ग्रामीण भागात सुयोग्य आणि किफायतशीर तंत्रज्ञानाचा विकास, आरोग्य सुविधांमध्ये सुधारणा, प्रदूषणविरहित तंत्रज्ञान किफायतशीर करणे आणि भारताला एक आघाडीचे उत्पादनक्षम राष्ट्र बनविण्यासह ज्ञान व तंत्रज्ञानाने युक्त उद्योगांचे केंद्र बनविणे ही भारतीय शास्त्रज्ञांसमोरील महत्त्वाची उद्दिष्टे असल्याचे मोदी म्हणाले.देशाची प्रगती आणि त्या देशातील मानवविकास यांचा संबंध विज्ञान आणि तंत्रज्ञानाशी आहे. जगातील दुसऱ्या क्रमांकाची महासत्ता म्हणून उदय होत असताना विज्ञान आणि तंत्रज्ञानविषयक घडामोडींमध्ये देखील दुसरा क्रमांक मिळविण्याची कामगिरी चीनने केली आहे, याकडे मोदींनी लक्ष वेधले.पंतप्रधान मोदींकडून नेहरूंचा गौरव !भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी कायम विज्ञान आणि तंत्रज्ञानाला प्राधान्य देत भारताला सक्षम करण्याचा प्रयत्न केला, असे गौरवोद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या वेळी काढले. महात्मा गांधींपासून पंडित नेहरू यांच्या नीतीवर भाजपा आणि हिंदुत्ववादी संघटना टीका करीत असतानाच पंतप्रधान मोदी यांनी नेहरूंबद्दल काढलेल्या या गौरवोद्गारावरून एका नव्या चर्चेला तोंड फुटले आहे.जगाने आपल्यासाठी त्यांचे दरवाजे बंद केले, त्या वेळी भारतीय शास्त्रज्ञांनी त्या परिस्थितीला जिद्दीने तोंड देण्यात महत्त्वाची भूमिका बजावल्याबद्दल पंतप्रधानांनी त्यांची प्रशंसा केली. ज्या वेळी जगाने आपल्याकडे सहकार्याची अपेक्षा केली़ त्यावेळी आपल्या समाजात असलेल्या स्वाभाविक वृत्तीला अनुसरून खुल्या दिलाने आपण सहकार्याचा हात पुढे केला, असेही त्यांनी नमूद केले.पहिल्याच प्रयत्नात मंगळ यानाला मंगळाच्या कक्षेत पोहोचवण्याची कामगिरी आणि ‘हुदूद’ या चक्रीवादळाचे अचूक भाकीत करून हजारो लोकांचे जीव वाचवण्यात भरीव योगदान दिल्याबद्दल पंतप्रधानांनी शास्त्रज्ञांचे कौतुक केले.प्रत्येक सरकारी विभागात विज्ञान आणि तंत्रज्ञानावर भर देणारा अधिकारी असावा आणि अशा प्रकारच्या उपक्रमांसाठी अर्थसंकल्पात ठरावीक निधीची तरतूद करावी, अशी सूचना पंतप्रधानांनी केली. आपल्या देशातील विज्ञान आणि शास्त्रज्ञ याविषयी आपण अभिमान बाळगत त्यांची प्रतिष्ठा राखली पाहिजे, असेही मोदी म्हणाले. भाषणाच्या सुरुवातीस मोदी यांनी ज्येष्ठ शास्त्रज्ञ वसंत गोवारीकर यांना श्रद्धांजली वाहिली.वाढत्या नैसर्गिक आपत्ती राज्यापुढे आव्हान निर्माण करीत असून, त्यावर उपाय शोधणे गरजेचे आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या वेळी म्हणाले. नैसर्गिक आपत्तींमुळे आतापर्यंत ८ हजार कोटी रुपयांचा खर्च झाल्याकडेही मुख्यमंत्र्यांनी लक्ष वेधले. या वेळी केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञान मंत्री डॉ. हर्षवर्धन यांचेही भाषण झाले.
विद्यापीठ, उद्योगांचा समन्वय आवश्यक
By admin | Published: January 04, 2015 2:27 AM