पुणे : प्रस्तावित विद्यापीठ कायद्यावर चर्चा करण्यासाठी सर्वपक्षीय आमदारांची बैठक येत्या आठवड्यात बोलाविली जाणार असून, त्यांच्या सूचना विचारात घेऊन नवीन विद्यापीठ कायद्याचा अध्यादेश काढला जाईल. त्यामुळे पुढील महिन्यापासून विद्यापीठ कायद्याची अंमलबजावणी सुरू होईल, असे संकेत राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी गुरुवारी पत्रकारांशी बोलताना दिले. मात्र, साहित्य संमेलनाध्यक्ष श्रीपाल सबनीस यांनी केलेल्या वक्तव्याबाबत सांस्कृतिक मंत्री तावडे यांनी कोणतीही भूमिका मांडण्यास नकार दिला.राज्याच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालय आणि पुणे विभागीय क्रीडा युवक संचालनालयातर्फे आयोजित राज्यस्तरीत युवा महोत्सवाच्या पारितोषिक वितरण समारंभानंतर तावडे पत्रकारांशी बोलत होते. तावडे म्हणाले, ‘वेळेअभावी नवीन विद्यापीठ कायद्यावर विधानसभेत चर्चा न झाल्याने कायदा मंजूर होऊ शकला नाही. प्रस्तावित कायद्यातील ९० टक्के गोष्टी चांगल्या आहेत. मात्र, १० टक्के बाबींवर सूचना देणार असल्याचे राजकीय पक्षांच्या आमदारांनी सांगितले आहे. त्याचप्रमाणे मार्चपर्यंत थांबण्याची आवश्यकता नसल्याचेही नमूद केले आहे. त्यामुळे येत्या आठवड्यात राजकीय पक्षांच्या प्रमुख नेत्यांशी व आमदारांशी चर्चा करून त्यांच्या सूचनांचा विचार करून कायद्याचा अध्यादेश काढला जाणार आहे.’महाराष्ट्रात आरोग्य विज्ञान विद्यापीठ आहे. त्यामुळे राज्यात आयुष विद्यापीठ स्थापन करण्याबाबतचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठविला जाणार नाही. आयुषचे एम्स आणण्याबाबत केंद्र शासनाकडे पत्रव्यवहार सुरू आहे, असेही तावडे यांनी सांगितले. तसेच दहावी - बारावीसाठी २० टक्के किमान गुण असावेत, याबाबतचा प्रस्ताव पुनर्विचारासाठी पाठविण्यात आला आहे. मात्र अधिक विद्यार्थी उत्तीर्ण होतात म्हणून किमान गुणांच्या पासिंगची अट घालण्यापेक्षा वेगळा विचार करता येईल का, हे तपासले जात असल्याचेही तावडे म्हणाले.
विद्यापीठ कायदा पुढील महिन्यापासून लागू
By admin | Published: January 08, 2016 2:53 AM