पुणे : केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयांतर्फे नॅशनल इन्स्टिट्यूट रँकिंग फ्रेमवर्क अंतर्गत देशभरातील विद्यापीठांंचे व शैक्षणिक संस्थांचे रँकिंग जाहीर करण्यात आले. त्यात राज्यातील शिवाजी विद्यापीठ, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ आणि औरंगाबाद येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा समावेश आहे. पुण्यातील काही महाविद्यालयांनी या रँकिंगमध्ये चांगले स्थान मिळविले आहे.१५ जानेवारी २०१६ पर्यंत आॅनलाईन पद्धतीने प्रस्ताव स्वीकारण्यात आले. त्यानुसार देशभरातील २३३ विद्यापीठांनी, १ हजार ४३८ अभियांत्रिकी महाविद्यालयांनी, ६०९ मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट, तसेच ४५४ फार्मसी महाविद्यालये आणि २८ आर्किटेक्चर महाविद्यालयांनी प्रस्ताव सादर केले होते. त्यात महाराष्ट्रातील काही विद्यापीठांचा व महाविद्यालयांचाही समावेश होता. परंतु, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासह राज्यातील काही विद्यापीठांनी व महाविद्यालयांनी प्रस्ताव दिले नाहीत.देशातील पहिल्या १०० विद्यापीठांच्या यादीत मुंबईतील काही इन्स्टिट्यूटसह शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर (२८), इन्स्टिट्यूट आॅफ आर्मानन्ट टेक्नॉलॉजी पुणे (३८), उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ (५९), डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ औरंगाबाद (८७) रँकिंगमध्ये आहेत. इंजिनिअरिंग महाविद्यालयांच्या यादीत कॉलेज आॅफ इंजिनिअरिंग, पुणे (२१), भारती विद्यापीठ कॉलेज आॅफ इंजिनिअरिंग, पुणे (६१), विश्वकर्मा इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजी, पुणे (६४) आणि पुण्यातील एमआटी कॉलेज आॅफ इंजिनिअरिंगला (९५) रँकिंग मिळाले. >जागतिक क्रमवारीत अव्वल विद्यापीठांंंमध्ये गणल्या जाणाऱ्या मुंबई विद्यापीठाला केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने जाहीर केलेल्या यादीत स्थानच मिळाले नसल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे. या यादीसाठी मनुष्यबळ विकास मंत्रालयाने मागविलेली माहिती पाठविलीच नसल्याने विद्यापीठाला या यादीत स्थान मिळाले नसल्याची कबूली विद्यापीठाचे जनसंपर्क विभागाचे उपकुलसचिव लीलाधर बन्सोड यांनी दिली आहे. काही महिन्यांपूर्वी मुंबई विद्यापीठाने जागतिक स्तरावरील ब्रिक्सच्या यादीतही स्थान पटकावण्यासाठी आवश्यक माहिती दिली नव्हती. त्यामुळे ब्रिक्सच्या यादीतही विद्यापीठाला स्थान मिळविता आले नव्हते. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयातर्फे जाहीर केलेल्या राष्ट्रीय संस्थांत्मक क्रमवारी प्रणालीमध्ये मुंबई विद्यापीठाला स्थान पटकावता आले नसले, तरी या यादीत मुंबईतील एकूण पाच संस्थांनी विविध गटांत आपली छाप सोडली आहे. त्यात आयआयटी मुंबई, आयसीटी मुंबई, बॉम्बे कॉलेज आॅफ फार्मसी आणि एस.पी. जैन मॅनेजमेंट इन्स्टिट्यूटचा समावेश आहे.
मुंबई विद्यापीठाचा पत्ता कट! - तीन विद्यापीठांना रँकिंग
By admin | Published: April 05, 2016 2:23 AM