लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मुंबई विद्यापीठातर्फे विधिच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी (एलएलएम) घेण्यात आलेल्या प्रवेश परीक्षेत उत्तरे बोल्ड करण्यात आल्याने विद्यापीठाने प्रश्नपत्रिका फोडल्याचा संशय व्यक्त होत आहे. सोबतच परीक्षेत अनेक प्रश्नांची पुनरावृत्ती झाल्याने, तसेच काही प्रश्न बोल्ड करण्यात आल्याने विद्यार्थ्यांचा गोंधळ उडाला. ३ जून रोजी विद्यापीठातर्फे एलएलएम अभ्यासक्रमासाठी प्रवेश परीक्षा (सीईटी) घेण्यात आली. प्रश्नपत्रिकेत प्रश्नांची उत्तरे बोल्ड करण्यात आली होती. एकच प्रश्न दोनदा विचारण्यात आला होता. काही प्रश्न बोल्ड करण्यात आले होते. शिवाय प्रवेश परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेवरच विद्यार्थ्यांना उत्तरे लिहायला सांगितली होती. ती प्रश्नपत्रिका जमा करून घेतल्याने निकाल लागल्यावर कोणती उत्तरे बरोबर होती, कोणत्या प्रश्नांची चुकली याचा ताळेबंद मांडता येणार नाही, अशी खंत विद्यार्थ्यांनी व्यक्त केली. मुंबई विद्यापीठातर्फे सदोष प्रश्नपत्रिका कशी काढण्यात आली, असा प्रश्न स्टुडंट लॉ कौन्सिलचे अध्यक्ष सचिन पवार यांनी उपस्थित केला आहे. सोबतच विद्यार्थ्यांना उत्तराचे पर्याय तर काही प्रश्न बोल्ड छापले होते. प्रश्नपत्रिकेत अशा प्रकारे गोंधळ विद्यापीठ कसे घालू शकते, असा प्रश्न उपस्थित केला आहे. या परीक्षेत पारदर्शकता नव्हती. अशा सदोष प्रश्नपत्रिकेवरून विद्यार्थ्यांना प्रवेश कसे देणार, असा प्रश्न उपस्थित करत एलएलएमसाठी प्रवेश प्रक्रिया पुन्हा घ्यावी, अशी मागणीही कौन्सिलतर्फे करण्यात येत आहे. >प्रतिक्रिया देऊ शकत नाहीप्रश्नपत्रिकेत झालेल्या गोंधळाविषयी मुंबई विद्यापीठ विधि प्रबोधिनीचे संचालक डॉ. अशोक येंडे यांच्याशी संपर्क साधला असता, ‘मी बाहेर आहे, परीक्षेदिवशीदेखील मी बाहेर होतो. त्यामुळे प्रतिक्रिया देऊ शकत नाही,’ असे त्यांनी सांगितले.
विद्यापीठानेच फोडली प्रश्नपत्रिका
By admin | Published: June 06, 2017 6:08 AM