- संदीप भालेराव, नाशिक
आरोग्य विद्यापीठाच्या विभाजनाची चर्चा रंगत असताना आता थेट मुख्यमंत्र्यांनीच ‘आयुष’चे स्वतंत्र विद्यापीठ नागपूरला स्थापन करण्यासाठी ‘आयुष’ संचालनालयाला समिती गठित करण्याचे आदेश दिल्यानंतर विभाजनाच्या हालचालींनी वेग घेतला आहे. उपरोक्त समितीने त्याचा अहवाल संचालनालयाला सादरही केला आहे. युती शासनाच्या काळात नाशिकमध्ये आरोग्य विद्यापीठाची स्थापना झाली आणि आघाडी सरकारच्या काळात विद्यापीठाने बाळसे धरले. नागपूर येथील एका आयुर्वेद महाविद्यालयाच्या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांकडे नागपूरला ‘आयुष’चे स्वतंत्र विद्यापीठ व्हावे, अशी मागणी काहींनी केली होती. त्यावर मुख्यमंत्र्यांनी नागपूरला ‘आयुष’चे स्वतंत्र विद्यापीठ होणे आवश्यक असल्याचे जाहीर करून संचालनालयाला त्यात लक्ष घालण्याचे सूचित केले. त्यानुसार ‘आयुष’ संचालनालयाने समिती स्थापन करून जागेचा शोध घेण्यास आणि विद्यापीठ स्थापनेच्या अनुषंगाने ३१ जानेवारीपर्यंत अहवाल सादर करण्यास सांगितले होते. समितीने नुकताच त्याचा अहवाल संचालनालयाला सादर केला. समितीमध्ये वैद्य गोविंदप्रसाद उपाध्याय (सचिव, भारतीय वैद्यक समन्वय समिती, नागपूर), वैद्य मनीषा कोठेकर (प्राध्यापक, शरीरक्रिया विभाग, श्री आयुर्वेद महाविद्यालय, नागपूर), डॉ. जगमोहन राठी (अध्यक्ष, निमा, नागपूर शाखा), वैद्य सुरेश खंडेलवाल, (सचिव, विदर्भ प्रांतीय आयुर्वेद संमेलन, नागपूर) यांचा समावेश आहे. नागपूरकर एकवटलेदिवंगत भाजपा नेते डॉ. दौलतराव अहेर यांच्या प्रयत्नाने नाशिकला आरोग्य विज्ञान विद्यापीठ झाले; मात्र अनेकदा विद्यापीठ विभाजनासाठी प्रयत्न झाले. आता नागपूरकर ‘आयुष’ विद्यापीठासाठी एकवटले असताना, नाशिकचे लोकप्रतिनिधी मात्र अनभिज्ञ आहेत.जागेचा प्रस्ताव सादर : नागपूरला विद्यापीठ स्थापन करण्यासंदर्भात डिसेंबरमध्ये नागपूरला बैठक झाली होती. विद्यापीठाच्या प्रशासकीय बाबी आणि जागेची पाहणी करण्यासाठी चार सदस्यीय समिती गठित केली होती. समितीने रामटेकजवळची ७० एकर खासगी मालकीची जागा शासनाला कळविली असून, तसा अहवाल पाठविला आहे. आरोग्य विज्ञान विद्यापीठावरील ताण आणि आयुष फॅकल्टीच्या कामांना होणारा विलंब पाहता, ‘आयुष’च्या विकासासाठी स्वतंत्र विद्यापीठाची गरज आहेच. त्यासाठीचा हा प्रयत्न असून, त्यातून आरोग्य विज्ञान विद्यापीठाला कोणतेही नुकसान होणार नाही. ‘आयुष’ची मागणी आम्ही मुख्यमंत्र्यांकडे केली होती. त्यांनी ती मान्य करीत प्रक्रिया सुरू केली आहे. - वैद्य गोविंदप्रसाद उपाध्याय, सचिव, भारतीय वैद्यक समन्वय समिती, नागपूर