जळगाव : शिक्षण घेऊन त्याचा समाजासाठी उपयोग होणे गरजेचे आहे. मात्र, आजची शिक्षण पद्धती मानवतेप्रति असलेल्या दायित्वापासून दूर जात आहे, अशी खंत व्यक्त करत चांगला माणूस घडविण्याची जबाबदारी विद्यापीठांची आहे, अशी अपेक्षा केंद्रीय सामाजिक न्याय व सबलीकरण राज्यमंत्री विजय साम्पला यांनी व्यक्त केली.काही जण प्राप्त शिक्षणाचा वापर चुकीच्या कामासाठी करतात. शिक्षणानंतर पैसा कसा कमवता येईल, याकडे काही विद्यार्थ्यांचे लक्ष असते. पैशांच्या मागे धावण्यामुळे कुटुंबातील सदस्यांचे नातेसंबंध संपुष्टात येत असल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली. अनुसूचित जातीच्या विद्यार्थिनींसाठी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील विद्यार्थिनी वसतिगृहाचे उद्घाटन व पदव्युत्तर शिक्षणशास्त्र विभागाच्या इमारतीचा पायाभरणी समारंभाप्रसंगी ते बोलत होते. केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय व सबलीकरण मंत्रालयाच्या बाबू जगजीवनराम छात्रावास योजनेंतर्गत हे वसतिगृह बांधण्यात आले आहे.महाविद्यालये व विद्यापीठांमधून विद्यार्थ्यांना जे शिक्षण दिले जात आहे. त्यात नातेसंबंध कसे टिकवून ठेवायचे? हे सांगितले जात नाही. त्यामुळे नातेसंबंध संपुष्टात येत असल्याचे ते म्हणाले. (प्रतिनिधी)
चांगला माणूस घडविण्याची जबाबदारी विद्यापीठांची
By admin | Published: July 27, 2015 12:42 AM