मुंबई- मुंबई विद्यापीठातीला निकालाच्या घोळानंतर राज्य सरकारला अखेर जाग आली असून त्यांनी डॉ. संजय देशमुख यांना कुलगुरुपदावरुन हटवलं. आता सरकारने पुन्हा चूक करु नये आणि या पदावर लायक व्यक्ती नेमावी अशी मागणी युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी केली आहे. कुलगुरु जबाबदारीतून मुक्त झाले, पण विद्यार्थ्यांचं जे नुकसान झालं, वर्ष वाया गेलं आणि मनस्ताप झाला, त्याची भरपाई सरकार कशी करणार असा सवालही आदित्य ठाकरे यांनी विचारला आहे..
ऑनलाइन उत्तरपत्रिका तपासणीच्या गोंधळामुळे गेल्या पाच महिन्यांपासून विद्यापीठ आणि कुलगुरूंवर टीकेची झोड उठली होती. शैक्षणिक नुकसान झाल्यामुळे विद्यार्थ्यांकडून ‘कुलगुरू हटाव’च्या मागणीने जोर धरला होता. राज्यपाल विद्यासागर राव यांनी विद्यापीठ कायद्यातील कलम ११ (१४) (ई) प्रमाणे अधिकाराच्या दुरुपयोगाचा ठपका ठेवत कुलगुरू संजय देशमुख यांना पदावरून काढून टाकलं. विद्यापीठाच्या १६० वर्षांच्या इतिहासात कुलगुरूंवर बडतर्फीची कारवाई होण्याची ही पहिलीच घटना आहे.
डॉ. संजय देशमुख यांची हकालपट्टी झाल्यानंतर युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी ट्विटरवरुन प्रतिक्रिया दिली. युवा सेनेने मुंबई विद्यापीठातील भोंगळ कारभाराविरोधात आंदोलन केलं होतं. त्यानंतर आता सरकार जागं झालं असून कुलगुरुंना हटविण्यात आलं आहे. पण इथेच थांबून चालणार नाही, सर्व प्रश्नांची उत्तरं मिळाली पाहिजेत, असं त्यांनी म्हटलं आहे. ऑनलाइन मूल्यांकनाचा निर्णय कोणी घेतला , हा घोटाळा नाही का, मूल्यांकनासाठी नेमलेली कंपनी कोणाची आहे, हा गोंधळ सुरु असताना शिक्षण खाते काय करत होते अशा प्रश्नांची सरबत्ती करत त्यांनी सरकारवर निशाणा साधला.
कुलगुरु जबाबदारीतून मोकळे झाले, पण ज्या विद्यार्थ्यांचं नुकसान झालं, वर्ष वाया गेलं, मनस्तापही झाला त्याची भरपाई सरकार कशी करणार असा सवाल त्यांनी विचारला आहे. राज्य सरकारने कुलगुरुपदावर लायक व्यक्ती नेमावी. तसंच ऑनलाइन मूल्यांकनाचा त्रास विद्यार्थी आणि शिक्षकांना देऊ नये, असंही त्यांनी सांगितलं.