रत्नागिरी : भारतीय दूरसंचार निगम लिमिटेड अर्थात बीएसएनएलने आपल्या दूरध्वनी ग्राहकांसाठी एक अनोखी योजना जाहीर केली असून रात्री ९ ते सकाळी ७ वाजेपर्यंत अगदी मोफत संभाषण करायला मिळणार आहे. तेही अगदी कुठल्याही कंपनीच्या दूरध्वनीसेवेसह अगदी भ्रमणध्वनी सेवेसाठीही योजना लागू होणार आहे. एक मे पासून देशभर ही योजना कार्यान्वित होणार आहे. जिल्ह्यातील ४३,८११ दूरध्वनीग्राहक तर ७८४४ वायरलेस सेवा असलेल्या ग्राहकांना याचा लाभ होणार आहे. भ्रमणध्वनी सेवा सुरू झाल्यानंतर ग्राहकांनी दूरध्वनी सेवेकडे पाठ फिरवली. दूरध्वनीचा वापर केवळ ब्रॉडबँडसेवेकरिताच होऊ लागला होता. मात्र, भ्रमणध्वनीसेवेचा वापर अधिकाधिक होऊ लागला. अधिकाधिक प्रगत झालेल्या तंत्रज्ञानाने भ्रमणध्वनी सेवेबरोबरच इंटरनेटचीही सुविधा यावर उपलब्ध करून दिली. त्यामुळे मग ब्रॉडबँड सेवाही मागे पडू लागली. आता तर दूरध्वनी सेवा बंद पडते की काय, अशी भीती निर्माण झाली आहे. गेल्या वर्षी ४६,७०० इतकी असलेली दूरध्वनींची संख्या वर्षभरात पुन्हा खाली आली असून आता ४३,८०० झाली आहे. त्यामुळे या सेवेकडे ग्राहकांनी पुन्हा वळावे, यासाठी बीएसएनएलने ही नवी योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.आज स्मार्ट फोन घराघरात नव्हे तर एकाकडेच एकापेक्षा जास्त फोन आलेत. त्यामुळे आता घरबसल्या मोबाईलवर हव्या त्या सेवा मिळू शकतात. काही अंशी त्याचा परिणाम दूरध्वनी सेवेवर झाला असला तरी घरातील ज्येष्ठांसाठी अजूनही कुठेतरी मजबूत असे जुने दूरध्वनी सेवेचे यंत्र वाजत असलेले दिसते.अजुनही ग्रामीण भागातील दूरध्वनी सेवा तग धरून आहे. शहरापेक्षा अधिक संख्या ग्रामीण भागात असून २६,३०० ग्राहक ग्रामीण भागातच आहेत. त्यामुळे सर्वच दृष्टीने चांगली असलेली ही सेवा कालबाह्य न होता ग्राहकांनी ती सुरू ठेवावी, यासाठी बीएसएनएल कंपनीने १ मेपासून रात्री ९ ते सकाळी ७ वाजेपर्यंत दूरध्वनीसेवा मोफत केली आहे. यासाठी कॉल दरात कुठलीही वाढ न करता केवळ मासिक दरात किरकोळ २० रूपयांची वाढ करून ही सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यात वन इंडिया, सुलभ योजनांसाठीही या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे.१ मे पासून सुरू होणाऱ्या या अभिनव योजनेचा लाभ जिल्ह्यातील ४३,८११ दूरध्वनी ग्राहक तर ७८४४ वायरलेस सेवा वापरणाऱ्या ग्राहकांना मिळणार आहे. ग्रामीण भागातील ग्राहकांसाठी दूरध्वनी सेवेचे भाडे १२० होते ते आता १४० रूपये होणार आहे. शहरी भागात १४० होते ते आता १६० रूपये होणार आहे.‘वन इंडिया’ योजनेचा लाभ घेणाऱ्यांना १९५ रूपयांऐवजी केवळ २२० रूपये द्यावे लागणार आहेत. या अल्प वाढीत रात्री ९ ते सकाळी ७ दहा तास मोफत संभाषणाचा लाभ मिळणार आहे. (प्रतिनिधी)बदलाचा स्वीकार करायला हवा...ग्राहकांचे बीएसएनएलशी अतूट नाते आहे. दूरध्वनी सेवेला फार वर्षांची परंपरा आहे. दूरध्वनीपासून दूर जाणाऱ्या ग्राहकांना पुन्हा या उपयुक्त सेवेकडे वळविण्यासाठी बीएसएनएल कंपनीने ही योजना नव्याने लागू केली आहे. लोक सेवेचा वापर अधिक करीत असल्याने ही योजना नक्कीच यशस्वी होईल.- सुहास कांबळे, महाव्यवस्थापक, बीएसएनएल, रत्नागिरी.
अमर्याद मोफत संभाषण
By admin | Published: April 17, 2015 10:22 PM