- यदु जोशीमुंबई : लॉकडाऊनमध्ये बंद असलेल्या शहरी किंवा ग्रामीण भागातील शाळांच्या मुलांपर्यंत ई-लर्निंगच्या माध्यमातून शिक्षण पोहोचविण्यासाठी धडपड सुरू असली तरी ते प्रत्यक्ष किती टक्के मुलांपर्यंत पोहोचतेय या विषयी अजूनही शंका असतानाच दुसरीकडे आदिवासी विकास विभागाने आपले शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, सुशिक्षित युवक, पालकांच्या मदतीने गाव/पाड्यांवर शिक्षणाची गंगा पोहोचविणारा ‘अनलॉक लर्निंग’ हा अनोखा उपक्रम हाती घेतला असून तो मोठ्या प्रमाणात यशस्वी होत आहे.आदिवासी विकास विभागाने त्यासाठीचा कार्यक्रम तयार केला आणि जुलैच्या मध्यापासून त्याची अंमलबजावणी सुरू केली. आश्रमाशाळांची मुले लॉकडाऊनमुळे दुर्गम भागातील आपापल्या गावी असताना त्यांना शिकवणे हे अतिशय मोठे आव्हान एकीकडे आणि वायफाय, ई-लर्निंगच्या सुविधा त्या ठिकाणी पोहोचू शकत नाहीत हे वास्तव दुसरीकडे अशी स्थिती असताना आदिवासी मुले शिक्षणापासून कोणत्याही परिस्थितीत वंचित राहता कामा नयेत, या एकमेव ध्यासातून हजारो हात पुढे आले आणि ई-संवादाची साधने नसली तरी फारसे काही अडत नाही, हेही या निमित्ताने सिद्ध झाले. इयत्ता बारावीनंतरच्या शिक्षणासाठी राज्यातील विविध वसतिगृहांमध्ये राहणारे ५४ हजार विद्यार्थीही सध्या त्यांच्या गावीच आहेत. त्यांचीही अध्यापन आणि शिक्षणपूरक उपक्रमांसाठी मदत घेतली जात आहे. त्यांच्या वसतिगृहांच्या गृहपालांनी त्यांचे व्हॉटस्अॅप ग्रूप तयार केले असून त्या माध्यमातून त्यांच्या योगदानाचा नियमित आढावा घेतला जातो.मोफत पुस्तके पोहोचविण्यात...शासकीय आश्रमशाळा, अनुदानित आश्रमशाळा आणि एकलव्य शाळा या सर्वच निवासी आहेत. मात्र, लॉकडाऊनमुळे तेथील मुले आपापल्या गावी गेली. अशावेळी त्यांना शिक्षणाशी जोडण्यासाठीचा कार्यक्रम आदिवासी विकास मंत्री के.सी.पाडवी यांच्या मार्गदर्शनाखाली आदिवासी विकास आयुक्त डॉ. किरण कुलकर्णी यांनी विभागाचे अधिकारी आणि तज्ज्ञ यांच्या मदतीने आखला.प्रत्येक शाळेच्या पाच ते आठ किमीच्या परिसरातील गावे/पाड्यांवर राहणाऱ्या विद्यार्थ्यांना मोफत पुस्तके पोहोचविण्यात आली. शिक्षक त्या-त्या ठिकाणी जाऊन विद्यार्थ्यांना फिजिकल डिस्टंन्सिंगचे भान राखत शिकवू लागले. पावसाळ्यात हे काम किती कठीण आहे हे आदिवासी भागात गेल्याशिवाय कळत नाही. नियमित शिक्षणाबरोबरच पूरक शिक्षणासाठी वर्कबूक, अॅक्टिव्हिटी बूक पुरविण्यात आले.गावोगावी समन्वय समित्या स्थापून गावातील सुशिक्षित लोक, पालकही शिक्षणाची गंगा मुलांपर्यंत पोहोचवित आहेत. पाड्यांपर्यंत यंत्रणा पोहोचविली जात आहे.
चार लाख आदिवासी विद्यार्थ्यांसाठी ‘अनलॉक लर्निंग’ उपक्रम
By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2020 7:24 AM