ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २५ - मुंबई विमानतळाजवळ पाच मानवविरहित पॅराशूट उडताना आढळल्याने खळबळ माजली असून रिमोट कंट्रोलद्वारे या पॅराशूटवर नियंत्रण ठेवले जात होते. या प्रकरणाची दखल घेत पंतप्रधान कार्यालयव व अन्य यंत्रणांनी अहवाल मागवला आहे.
शनिवारी संध्याकाळी ५.५५ मिनीटांनी मुंबईहून अहमदाबादला जाणा-या जेट एअरवेजच्या विमानाचे वैमानिक कॅप्टन दिनेश कुमार यांना विमानतळाच्या हद्दीत पाच पॅराशूट उडताना आढळले. जमिनीपासून सुमारे १५० फूटवर हे पॅराशूट उडत होते. विशेष बाब म्हणजे या पॅराशूटमध्ये कोणीही नसल्याने दिनेश कुमार यांनी या घटनेची माहिती हवाई वाहतूक नियंत्रण कक्षाला दिली. नियंत्रण कक्षाने नौदल व जुहू नियंत्रण कक्षाला ही माहिती दिली. हवेच्या विरुद्ध दिशेने हे पॅराशूट जात असल्याने त्यांच्यावर रिमोट कंट्रोलने नियंत्रण ठेवले जात होते हे स्पष्ट होते असे एका अधिका-याने म्हटले आहे. या घटनेनंतर काही काळ मुंबई विमानतळावरील विमानाचे लँडिंग व टेक ऑफ थांबवण्यात आले होते. एअर इंडिगोच्या एका विमानाचे लँडिगही थांबवण्यात आले होते. रडारवर कोणतीही संशयास्पद हालचाल टीपली गेलेली नाही असे स्पष्टीकरण विमानतळ प्राधिकारणाने दिले आहे. दरम्यान हे पॅराशूट नसून चीनी आकाश दिवे असावे असा अंदाजही व्यक्त केला जात आहे.