ऑनलाइन लोकमत
वर्धा, दि. 11 - बाल निरीक्षण गृहाच्या काळजीवाहकाकडून बालकांचे अनैसर्गिक लैंगिक शोषण होत असल्याची धक्कादायक बाब येथे उजेडात आली. याप्रकरणी पीडित मुलांच्या बयाणावरुन काळजीवाहक गणेश राजमलवार व प्रकरण दडपल्याप्रकरणी अधीक्षक महेश हजारे या दोघांना अटक करण्यात आली आहे.
ही घटना मंडळवारी रात्री उजेडात आली. यानंतर बुधवारी सकाळी जि.प.चे महिला व बाल कल्याण अधिकारी सुनील मेसरे यांच्या तक्रारीवरुन संबंधितांवर पोलीस कारवाई करण्यात आली. या घटनेनंतर तेथील पीडित व बयाण देणाºया मुलांना सुरक्षेच्या दृष्टीने शहरातील दुसºया निरीक्षण गृहात हलविले आहे, अशी माहिती बालकल्याण समितीने दिली.
वर्धेतील गोपुरी परिसरात शासकीय निरीक्षण गृह आहे. याठिकाणी १० मुले वास्तव्यास आहेत. याची जबाबदारी अधीक्षक महेश हजारे याच्यावर आहे. तर गणेश राजमलवार हा तेथे काळजीवाहक म्हणून कर्तव्य बजावतो. तेथील एका बालकाला पालक मिळाल्याने तो त्यांच्यासह गेला. दरम्यान, येथील काळजीवाहकाने त्या बालकाशी एक वर्षापूर्वी केलेल्या अनैसर्गिक कृत्याची बतावणी इतरत्र न करण्याची धमकी देत पालकाकडून पैसे आणण्याचा तगादा लावला. यामुळे त्रस्त झालेल्या त्या पीडित बालकाने याची तक्रार बालसंरक्षण समितीकडे केल्याने त्या काळजीवाहकाचे बिंग फुटले.
समितीने याची चौकशी सुरू केल्याची माहिती मिळताच या बालकाला मारहाण करणे व त्याला शिवीगाळ करण्याचे प्रकार सुरू झाले. शिवाय याची वाच्चता कुठे केल्यास जीवे मारण्याची धमकीही दिल्याचे चौकशीत समोर आल्याची माहिती समितीच्यावतीने देण्यात आली. या काळजीवाहकाने इतर बालकांसोबतही अनैसर्गिक कृत्य केल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
या प्रकरणी बालकल्याण समिती तसेच पोलीस अधीक्षक कार्यालय येथील महिला सुरक्षा कक्षातील अधिकारी, पोलीस अधीक्षक कार्यालयातील सहायक पोलीस निरीक्षक पी.टी. एकुरके यांनी पीडित बालकाचे बयाण नोंदविले. या बयाणात पीडित बालकाने घडलेला संपूर्ण प्रकार कथन केला आहे. या बयाणावरून महिला बालकल्याण समितीच्या अधिकाऱ्यानी दिलेल्या तक्रारीवरून शहर ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
असा झाला प्रकार उघड
या निरीक्षण गृहात असलेल्या एका बालकाला पालक मिळाला होता. मात्र निरीक्षणगृहात असताना त्याच्याशी काळजीवाहकाने अनैसर्गिक कृत्य केले होते. या प्रकारामुळे गत काही दिवसांपासून काळजीवाहकाकडून या पीडित बालकाला त्याच्या पालकाकडून पैसे आणण्याचा तगादा लागवण्यात येत होता. यातून त्याला त्रास देणे शिव्या देणे, असे प्रकार घडत गेले. यामुळे झालेल्या त्रासामुळे त्याने बालसंरक्षण समितीला दिलेल्या तक्रारीवरून हा प्रकार उघड झाल्याचे समितीच्यावतीने सांगण्यात आले आहे.
हा प्रकार एक वर्षांपूर्वी घडला असल्याने त्या काळात येथे वास्तव्यास असलेल्या बालकांचा शोध घेत त्यांचे बयाण नोंदविण्यात येणार आहे. या संदर्भात जेमतेम एक बालक समोर आल्याचे समितीने सांगितले.
निरीक्षण गृहात सध्याच्या स्थितीत १० मुले
या निरीक्षण गृहात दोन न्यायालयाची मुले असतात. यात बाल न्याय मंडळ म्हणजेचे बालगुन्हेगार व काळजी तथा सुरक्षेची गरज असलेली बालके. या दोन्ही प्रकारातील मिळून येथे आजच्या स्थितीत एकूण १० मुले असल्याची माहिती समितीकडून देण्यात आली आहे. या बालकांशी असा प्रकार झाला अथवा नाही याचा तपास सुरू असून पीडित बालकांची संख्या वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
काळजीवाहकाच्या रंगत होत्या पार्ट्या
या निरीक्षण गृहात काळजीवाहकाच्या ओल्या पार्ट्या रंगत असल्याचे येथील बालकांनी दिलेल्या बयाणातून समोर आले आहे. या प्रकरणी अधिक चौकशी सुरू आहे. यात आणखी कोणी सहभागी होते काय याचा शोध सुरू असल्याचे बालकल्याण समितीच्यावतीने सांगण्यात आले आहे.
या प्रकरणात बालकल्याण समितीने पीडित मुलांच्या घेतलेल्या बयाणावरून पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली. या प्रकरणात चौकशी सुरू आहे. कार्यालयीन बाब असल्याने अधिक माहिती देऊ शकत नाही.
- सुनील मेसरे, प्रभारी, महिला बालकल्याण अधिकारी, वर्धा
या प्रकरणाची तक्रार येताच दोघांना अटक करण्यात आली आहे. सध्या एक बालक समोर आला आहे. आणखी कोणी येतो काय याची प्रतीक्षा आहे.
- राजेंद्र शिरतोडे, ठाणेदार वर्धा शहर.