अमरावती : वृद्ध कैद्याने २५ वर्षीय तरुण कैद्याशी अनैसर्गिक कृत्य केल्याचा धक्कादायक प्रकार अमरावती मध्यवर्ती कारागृहात उघडकीस आला. न्यायालयीन आदेशावरून फेरजरपुरा पोलिसांनी रविवारी दुपारी याप्रकरणी गुन्हा नोंदविला आहे. धनराज सुरोशे (रा.मध्यवर्ती कारागृह) असे आरोपीचे नाव आहे.
काही दिवसांपासून अमरावती मध्यवर्ती कारागृह विविध घटनांमुळे चर्चेत आले आहे. मध्यंतरी कारागृहात गांजा आढळून आल्याने खळबळ उडाली होती. आता एका वृद्ध कैद्याने चक्क एका २५ वर्षीय कैद्याशीच अनैसर्गिक कृत्य केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. हा तरुण कैदी पाच वर्षांपूर्वी मध्यवर्ती कारागृहात आला आहे. त्यानंतर तेथील कैद्यांशी परिचय झाल्यानंतर आरोपी धनराज सुरोशे नामक कैदीला तो आजोबा म्हणून हाक मारू लागला. आजोबा धनराज कारागृहातील काही कामे त्या तरुणाकडून करून घेत होता. एकेदिवशी रात्री १२ वाजताच्या सुमारास तो २५ वर्षीय बंदी धनराजसोबत असताना, त्याने अनैसर्गिक कृत्य केले. याबाबत त्याने कारागृह प्रशासनाकडे तक्रार केली. त्यानंतर त्या तरुण कैद्याला प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी (१) यांच्या न्यायालयात हजर केले गेले. त्यावेळी न्यायालयाने त्या कैद्याचे बयाण नोंदविले. त्यावेळी त्याच्यासोबत कारागृहात घडलेला प्रकाराचे त्याने कथन केले.
याप्रकरणात न्यायालयाने सीआरपीसीच्या कलम १८६ (३) प्रमाणे गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. तो आदेश शनिवारी फेरजरपुरा पोलिसांना प्राप्त झाला. आदेशाची अंमलबजावणी करीत पोलिसांनी रविवारी आरोपी धनराज सुरोशेविरुद्ध भादंविच्या कलम ३७७ अन्वये गुन्हा नोंदविला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गुर्जर करीत आहे. या प्रकरणाच्या अनुषंगाने कारागृह अधीक्षक रमेश कांबळे यांच्याशी संपर्क केला असता, त्यांनी प्रतिसाद दिला नाही.
अनेक कैद्यांसोबत केले कृत्यमध्यवर्ती कारागृहात शिक्षाप्राप्त कैदी वर्चस्व निर्माण करण्याचे प्रयत्न करीत लहान कैद्यांना दबावात ठेवतात. धनराजने तरुण कैद्याला धाक दाखवून अनैसर्गिक कृत्य केले. त्याने अनेक कैद्यांशी अनैसर्गिक कृत्य केले असावे, असा बयाण पीडित कैद्याने न्यायालयात नोंदविले आहे.
न्यायालयाच्या आदेशावरून संबंधित कैद्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील कार्यवाहीची प्रकिया लवकरच सुरू होईल.- आसाराम चोरमले, पोलीस निरीक्षक
कारागृहात अशाप्रकारे कृत्य झाल्याची माहिती माझ्यापर्यंत पोहोचली नाही. याबाबत चौकशी करू. - योगेश देसाई,कारागृह उपमहानिरीक्षक, नागपूर