मुंबई : हे सरकार पडावे की राहावे यावर मी बोलणार नाही पण जेव्हा जेव्हा अशी तत्त्वशून्य आघाडीची अनैतिक सरकारे आली ती फार काळ टिकली नाहीत हा इतिहास आहे, असे मत केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांनी शनिवारी महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारच्या भवितव्याबद्दल येथे व्यक्त केले.एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात ते बोलत होते. प्रश्नोत्तराच्या सत्रात गडकरी म्हणाले की, भाजप आणि शिवसेनेची युती ही बाळासाहेब ठाकरे आणि प्रमोद महाजन यांनी अस्तित्वात आणली. ती सर्वात जास्त काळ टिकली कारण आमच्या विचारांमध्ये समानता होती. आज काँग्रेस-राष्ट्रवादी व शिवसेनेच्या मूळ विचारातच तफावत आहे. त्यामुळे त्यांना कधी ना कधी अडचण ही येणार आहे. विचारसरणीपेक्षा जेव्हा सत्ता महत्त्वाची असते, तेव्हा विचारसरणी, तत्वे मागे पडतात आणि अशी अनैसर्गिक युती होते व ती काळाच्या ओघात टिकत नाही असा इतिहास आहे. महाविकास आघाडी सरकारचे काय होते ते बघू, असेही गडकरी म्हणाले. आंबेडकर, शाहू, फुलेंचा विचार मांडणारी काँग्रेस, राष्ट्रवादी कोणत्या विचाराने शिवसेनेबरोबर गेली हे मला समजत नाही, असा चिमटाही त्यांनी काढला.पण मनभेद नाहीतउद्धव ठाकरे यांचा मला मध्यंतरी फोन आला. तुम्ही माझ्यावर नाराज आहात का, असे त्यांनी विचारले. मी म्हणालो बिलकूल नाही. मतभेद झाले असतील पण मनभेद नाहीत. राज्याच्या हितासाठी मी नेहमीच मदतीची भावना ठेवली आहे. त्यात मी पक्षीय भेदाभेद करीत नाही, असा अनुभव सांगून गडकरी म्हणाले की, महाराष्ट्रातील एकाही शेतकऱ्याने आत्महत्या करू नये हीच आपली मनोकामना आहे आणि तो दिवस कोणाहीमुळे येणार असेल तर आपण त्याला मदतच करू.
'तत्त्वशून्य आघाडीचे सरकार फार काळ टिकत नाही'
By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2020 3:51 AM