सोलापूर : दुष्काळ आणि कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या मुलांची विस्कटलेली शैक्षणिक घडी आज भारतीय जैन संघटनेने पुन्हा बसविली. जिल्ह्यातील या शेतकऱ्यांच्या २० मुलांचे संघटनेने पुण्याजवळील वाघोली येथे ‘बीजेएस’ शाळेमध्ये निवासी स्वरूपाचे शैक्षणिक पुनर्वसन केले. अतिशय भावपूर्ण वातावरणात या मुलांना आज निरोप देण्यात आला. बारावीपर्यंत तेथे मुलांच्या शिक्षणाची सोय होणार आहे.सोलापूर जिल्ह्यात गेल्या सहा महिन्यात कर्जबाजारीपणामुळे वीसहून अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. त्यामुळे त्यांच्या कुटुंबातील मुलांचे शिक्षण खोळंबले. भारतीय जैन संघटनेने या कुटुंबांना ठोस मदत करून त्यांच्या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी उचलली. या शेतकरी कुटुंबातील १३ मुले आणि ७ मुलींची शिक्षणाची मोफत सोय संघटनेच्या वाघोली येथील शाळेत करण्यात आली. या मुलांना निरोप देण्यासाठी महापौर सुशीला आबुटे, माजी आमदार आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष दिलीप माने, ‘लोकमत’चे संपादक राजा माने, पोलीस उपायुक्त अपर्णा गीते, स्वाती मनासावले उपस्थित होते. भारतीय जैन संघटनेचा हा उपक्रम अतिशय स्तुत्य असून बारावीनंतरच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेऊ, असे दिलीप माने म्हणाले.चांगला माणूस घडविणारवाघोली येथील भारतीय जैन संघटनेच्या शाळेमध्ये मुलांना शिक्षण देण्याबरोबरच त्यांच्यावर चांगले संस्कार करण्यात येतील. त्यामुळे पालकांनी मुलांची चिंता करू नये, देशाचा सुजाण नागरिक आणि चांगला माणूस घडविण्याचे आमचे ध्येय असल्याचे प्रा. ज्योतीराम मोरे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
विस्कटलेली शैक्षणिक घडी नव्याने बसविली!
By admin | Published: June 14, 2016 2:49 AM