'राष्ट्रवादी मंथन वेध भविष्याचा' या टॅगलाईनखाली राष्ट्रवादीचे शिर्डीत दोन दिवसीय राज्यस्तरीय शिबीर पार पडले. हॉस्पिटलमधून थेट शिर्डीत येत शरद पवार यांनी तब्बेतीमुळे थोडक्यात मार्गदर्शन केले. राष्ट्रवादीचे उत्तमरीत्या शिबीर झाले आहे. अनेकांची भाषणे ऐकण्याची संधी हॉस्पिटलमध्ये मिळाली. शिस्तबध्द पध्दतीने पक्षाला शक्ती देणारे शिबीर जयंत पाटील यांनी आयोजित केले त्याबद्दल शरद पवार यांनी त्यांचे कौतुक केले.
सरकार गेलं की चिंता करायची नाही. एवढं काम करु की महाराष्ट्राचे चित्र पालटण्याची ताकद आपल्यात आहे. आम्हाला हिंदूत्व कुणाकडून शिकण्याची गरज नाही. आमचं हिंदूत्व छत्रपती शिवाजी महाराजांचे आहे असे सांगतानाच आपल्यात एकतेचा अभाव होता कामा नये. संकट आलं की पाठीशी ताकदीने उभे राहिले पाहिजे. आत्मविश्वास ठेवा. कुठल्याही मंत्री किंवा आमदारांनी एवढ्या वर्षात चुकीचे कधी काम केले नाही. त्यामुळे आपल्या कुणावर संकट आले तर ताकदीने उभे रहा असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केले.
शिबीरात शेवटच्या दिवशी जयंत पाटील यांनी पक्षाचे नवनवीन व्हिजन यावेळी मांडले आणि कार्यकर्त्यांमध्ये जोश निर्माण केला. राज्यात ज्याप्रकारे सरकार यायला हवे ते आले नाही. भाजपच्या १०५ मध्ये अस्वस्थता आहे कारण हे सरकार ४० जणांसाठीच काम करत असल्याची भीती भाजप नेत्यांमध्ये आहे असा दावा जयंत पाटील यांनी यावेळी केला. राष्ट्रवादी व पवारसाहेब काय करतात याबाबत राज्यात चर्चा असते. आपण कुणाशी लढणार आहोत याचे मार्गदर्शन दोन दिवस या शिबीरात झाले. आईवडिलांना शिव्या द्या पण मोदींना नको बोलतात त्यांच्याविरोधात आपली लढाई आहे असेही जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.
सोयीचे असेल ते कसे वाजवायचे आणि आपण बोलतो तेच बाहेर वाजते त्यांच्याविरोधात आपली लढाई आहे. जिल्हाधिकाऱ्यांना दारु पिता का असं विचारणारा मंत्री या मंत्रीमंडळात आहे. हे कोणत्या पातळीवर आहेत लक्षात येत आहे त्याविरोधात आपली लढाई असल्याचे जयंत पाटील यांनी सांगितले. अतिवृष्टी झाली त्या सर्व ठिकाणी ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी करणारा ठराव आज या शिबिरात करण्यात आला. महाराष्ट्रासोबत दुसरं राज्य स्पर्धा करु शकत नाही परंतु घाबरुन दुसर्या राज्यात जाणारा प्रकल्प थांबवला जात नाही याबाबत तीव्र नाराजी पाटील यांनी व्यक्त केली.
पूल पडणे हा ईश्वरी संकेत असे मोदी पश्चिम बंगालच्यावेळी बोलले असतील तर आता गुजरातमध्ये हा संकेत दिसला पाहिजे असा खोचक टोलाही पाटील यांनी यावेळी लगावला. विधानसभेत आपल्या आमदारांनी चांगली कामगिरी केली आहे. रोहित पवार, अनिल पाटील, अमोल मिटकरी, यांच्यासह अनेक आमदारांना विधानसभेत थांबा असं बोलावं लागतं आहे अशी कामगिरी आहे. ही नवीन पिढी राष्ट्रवादीचा रथ पुढे नेल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास जयंत पाटील यांनी विधानसभेतील युवा आमदारांच्या कामकाजावर बोलताना व्यक्त केला.
आपला पक्ष ताकदीने उभा करुया. पुढच्या काळात सक्षम व सर्वसामान्यांचा विचार करणारा पक्ष आहे हे चित्र निर्माण करुया. २३ वर्षात चार वेळा सत्ता स्थापन करायला मिळाली आहे. महापुरुषांकडून प्रेरणा घेऊन आपला पक्ष काम करतोय. २०२४ ला राष्ट्रवादीचे रौप्यमहोत्सवी वर्ष आहे. २५ वर्ष पूर्ण होत आहे त्यामुळे ताकदीने काम केले तर एक नंबरचा पक्ष बनेल असे आवाहनही जयंत पाटील यांनी केले.
महागाई वाढली आहे. गॅसची सबसिडी दिली नाही हे लोकांना सांगण्याची गरज आहे. भाजपच्या कामाने जनतेच्या मनात निराशा वाढलीय. भाजप शंभर टक्के संसदेत निवडून जाणार असे चित्र निर्माण केले जात आहे परंतु आकडेवारी पाहिली तर याला छेद देणारे चित्र आहे असेही जयंत पाटील यांनी काही आकडेवारी सांगत स्पष्ट केले. सध्या ५० खोक्यांची चर्चा जोरदार सुरू आहे. शेंबड्या पोरांनाही ही चर्चा माहीत झाली आहे म्हणून हीच शेंबडी पोरं नागपूरात जाऊन आंदोलन करत आहेत असा टोलाही जयंत पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांना लगावला.
राष्ट्रवादीच्या नेत्यांना त्रास दिला जात आहे तरीही राष्ट्रवादी लढा देत आहे. राष्ट्रवादीच्या नेत्यांना टार्गेट करण्याचे काम सुरू आहे आव्हान देणारा एकमेव पक्ष आहे त्यामुळे हल्ला होत आहे असेही पाटील म्हणाले. भूमिका आणि नवीन जबाबदारी याबाबतही जयंत पाटील यांनी आपले विचार मांडले. पक्षात एकनिष्ठ असणारा कार्यकर्ता पुढे आला पाहिजे असे मत जयंत पाटील यांनी व्यक्त केले. एनसीपी अॅप तयार करण्यात आले. यामध्ये तुम्ही काय करता इथपासून तुम्हाला माहिती देण्याची सुविधा, संवाद, उपक्रम यामध्ये असणार आहे. नेत्यांना भेटण्यापेक्षा मेरीटनुसार प्रत्येकाला संधी दिली जाईल असेही जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.
आयुष्यभर यशवंतराव चव्हाण यांच्या दिशेने काम करत जनतेला सोबत घेऊन 'लोक माझे सांगाती' प्रमाणे काम आदरणीय शरद पवारसाहेब करत आहेत असेही जयंत पाटील म्हणाले. डिसेंबरमध्ये पक्षाचा निवडणूक कार्यक्रम जाहीर होईल आणि रिजनलप्रमाणे निवडणूक घेतली जाईल. 'पक्षात सुवर्ण संधी, सुवर्ण वेळ, विजयाचे सहा स्तंभ' आपण आणणार आहोत असेही पाटील यांनी स्पष्ट केले. आपलं अपयश झाकण्यासाठी टिव्हीवर दाखवले जातात. त्यावेळी त्यांचे अपयश काय आहे शोधायला हवे. हे एकसंघपणे काम करायला हवे. लीडर मॅपिंग सारखी एक सामुहिक जबाबदारी दिली जाणार आहे. स्वतः जिंकणाऱ्या सोबत अजुन एक जिंकवण्याची जबाबदारी आहे. आपण ताकदीने एकत्र काम केले तर राज्यात शंभरी गाठायला वेळ लागणार नाही असा विश्वास जयंत पाटील यांनी व्यक्त केला.