मुंबई : काही अनुचित प्रकरणांमुळे महाराष्ट्र पोलीस दलाच्या प्रतिमेबाबत विविध प्रश्न उपस्थित केले जात आहेत. सामान्य नागरिकांसह समाजातील सर्व घटकांचा पोलिसांवर विश्वास वाढेल, अशी पावले उचलण्यासाठी प्रयत्न केले जातील, परिस्थिती सुधारण्यासाठी आवश्यक कार्यप्रणाली, प्रसंगी शासनाच्या सहकार्याने जुजबी उपचार पद्धती राबविली जाईल, असे राज्याचे नूतन पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
राज्य सरकारने ‘डीजीपी’पदाचा अतिरिक्त कार्यभार रजनीश सेठ यांच्याकडून पांडे यांच्याकडे सोपविण्याचा आदेश शुक्रवारी रात्री जारी केला. शनिवारी त्यांनी पोलीस मुख्यालयात हजर राहून पदाची सूत्रे स्वीकारली. त्यानंतर ‘लाेकमत’च्या प्रतिनिधीशी केलेली बातचीत :
आपण राज्य सरकारवर नाराज होता, ती नाराजी दूर झाली का?आता हा विषय संपलेला आहे.
अँटिलिया स्फोटक कार, सचिन वाझे, परमबीर सिंग यांचे आरोप, सीबीआय चौकशी आदींमुळे पोलीस दलाचे खच्चीकरण झाले आहे का?एखाद्या घटनेमुळे महाराष्ट्र पोलीस दलाची प्रतिमा मलिन होत नाही. या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. त्यामुळे त्यावर भाष्य करणे योग्य नाही. महाराष्ट्र पोलीस हा देशातील एक आघाडीचा फोर्स आहे. त्याचा लौकिक कायम राहील, आपण प्रयत्न करू. नियमबाह्य, अनिष्ट प्रथा मोडीत काढू, त्यासाठी शासनाच्या संमतीने कठोर निर्णय घ्यावे लागले तरी त्यात कुचराई करणार नाही. सर्व अधिकारी व कर्मचारी समन्वयाने काम करून महाराष्ट्र पोलीस दलाचा लौकिक कायम राखतील.
पोलीस दलाची धुरा आपल्याकडे आल्याने अधिकारी घाबरले आहेत?पोलीस हा कायदा आणि समाजाचा रक्षक असतो. चांगल्या हेतूने काम करताना चुका झाल्यास, ते समजू शकतो. मात्र, जर बेशिस्त वर्तन करून खात्याची बदनामी करत असल्यास ते कदापि खपवून घेणार नाही.
आपण काही अतिवरिष्ठ अधिकाऱ्यांची चौकशी केली आहे?सरकारने सोपवलेली जबाबादारी व्यवस्थित पार पाडली. त्याबाबतचा पुढील निर्णय सरकार घेईल.
पोलीस दलातील आयपीएस लॉबीबद्दलची आपली भूमिका काय?३५ वर्षे कोणत्याही लॉबी, दबावाला बळी न पडता काम केले. प्रत्येकाने आपले कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडावे, हीच अपेक्षा सर्वांकडून आहे. पोलीस दल सर्वोत्तम बनावे यासाठी सर्वांनी काम करावे हीच इच्छा आहे.
(मुलाखत – जमीर काझी)