पुणे :
अवकाळीच्या तिसऱ्या झटक्यात राज्यातील १४ जिल्ह्यांमधील तब्बल २८ हजार हेक्टरवरील पिके जमीनदोस्त झाली. त्यात सर्वाधिक नाशिक जिल्ह्यातील तब्बल आठ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. परिणामी आतापर्यंतचा नुकसानीचा आकडा तब्बल एक लाख तीस हजार हेक्टरवर पोहोचला आहे.
अवकाळीच्या पहिल्या टप्प्यात अर्थात ४ ते ९ मार्चदरम्यान झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीने राज्यातील १५ जिल्ह्यांमधील ३८ हजार ६०६ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले होते. त्यानंतर गुढीपाडव्यापूर्वी दुसऱ्यांदा दिलेल्या झटक्याने हजारो शेतकऱ्यांचा पाडवा कडू झाला होता. १५ ते २१ मार्चदरम्यान झालेल्या या पावसामुळे ३० जिल्ह्यांमध्ये तब्बल १ लाख ६० हजार हेक्टरवरील पिके झोपली.
आता तिसऱ्यांदा झालेल्या अवकाळी व गारपिटीमुळे कृषी विभागाने केलेल्या प्राथमिक अंदाजात २८ हजार २८७ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. त्यात नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक ८ हजार ३ हेक्टरवरील कांदा, भाजीपाला व फळपिकांचा समावेश आहे. त्या खालोखाल नगर जिल्ह्यात ७ हजार ३०५ हेक्टरवरील मका, कांदा, वाटाणा, कलिंगड, आंबा, झेंडू, गहू, हरभरा, ज्वारी, बाजरी, डाळिंब आदी पिकांचे नुकसान झाले. अकोला जिल्ह्यात तब्बल ५ हजार ८५९ हेक्टरवरील भुईमूग, कांदा, गहू, हरभरा व इतर पिकांना फटका बसला आहे.
कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी रविवारी बीड व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात अवकाळीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली. सोमवारी ते अकोला जिल्ह्यातील पिकांची पाहणी करणार आहेत. मी नाशिक जिल्ह्यातील नुकसानीची पाहणी करणार आहे. अन्य वरिष्ठ अधिकारी नगर, धाराशिव या जिल्ह्यांत पाहणी करणार आहेत.- सुनील चव्हाण, आय़ुक्त, कृषी
जिल्हानिहाय नुकसान क्षेत्र (हेक्टरमध्ये)रत्नागिरी ४६रायगड ५०सिंधुदुर्ग ३७नाशिक ८००३धुळे २९जळगाव ५३पुणे ३नगर ७३०५सातारा ४७बीड २७६२धाराशिव २८५९बुलढाणा ११७४अकोला ५८५९नागपूर ६०एकूण २८,२८७