पुणे : पुणे जिल्ह्यात कात्रज, कोंढवा, सिंहगड, बाणेर, कोथरूड, भोरसह अनेक भागात सोमवारी वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. लॉकडाउन होण्याच्या भीतीने अनेक नागरिकांनी खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी केली आहे. त्यातच वादळी वाऱ्यासह पाऊस सुरू झाल्याने लोकांची एकच धावपळ उडाली. रात्री उशिरापर्यंत अनेक भागात पावसाच्या सरी कोसळत होत्या. गडचिरोली जिल्ह्यातील वनक्षेत्रात अनेक ठिकाणी भडकलेल्या वणव्यांना दोन दिवस झालेल्या अवकाळी पावसाने विझवले. त्यामुळे वन विभागाचे काम हलके झाले आहे.
राजापुरात हजेरीराजापूर (जि. रत्नागिरी) : दोन दिवसांच्या प्रचंड उकाड्यानंतर रविवारी रात्री पावसाने राजापूर तालुक्यात हजेरी लावली. पावसामुळे हवेत काहीसा गारवा पसरला असला, तरी पावसामुळे आंबा व काजू पिकाला धोका निर्माण झाला आहे.
नगरमध्ये वीज पडून १४ शेळ्यांचा मृत्यूकेडगाव (जि. अहमदनगर) : घोसपुरी येथे सोमवारी दुपारी वीज पडून दोन शेतकऱ्यांच्या १४ शेळ्यांचा मृत्यू झाला. प्रशासनाने पंचनामा केला असून, शेतकऱ्यांना भरपाई मिळावी अशी मागणी होत आहे.
सोलापूर जिल्ह्यात वीज पडून दोन म्हशी दगावल्यासोलापूर : सोलापूर जिल्ह्यात सोमवारी अनेक भागात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने हजेरी लावली. बार्शी तालुक्यातील जामगाव येथे वीज पडून दोन म्हशी दगावल्या. जिल्ह्यात रविवारी, सोमवारी सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. दुपारनंतर अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली. उस्मानाबाद जिल्ह्यात औसा शहर व परिसरात सोमवारी दुपारी अचानक वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस झाला. त्यामुळे आंब्यासह फळबागांना फटका बसला. म्हशीवर वीज पडल्याने म्हैस दगावली.