मुंबई : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी सहा जणांची विधान परिषदेवर राज्यपाल नियुक्त सदस्य म्हणून शिफारस केल्याचे वृत्त मंगळवारी दुपारी व्हायरल झाले. वृत्तवाहिन्यांनी दणक्यात बातमीदेखील चालविली. पण हे व्हायरल पत्र बोगस असल्याचे राजभवनकडून स्पष्ट करण्यात आल्यानंतर विषयावर पडदा पडला. आता ते बोगस पत्र आले कुठून, याबद्दल उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत. राज्यपाल कोश्यारी यांनी ६ नोव्हेंबर २०२० रोजी हे पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठविले होते आणि त्यात सहा जणांची नावे नमूद करून, त्यांना विधान परिषदेवर नियुक्त करण्याची शिफारस राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत करावी, असे राज्यपालांनी या पत्रात म्हटल्याचाही दावा बातमीत करण्यात आला. ही सर्व सहा नावे सामाजिक, राजकीय व औद्योगिक क्षेत्राशी निगडित असल्याचेही सांगितले गेले. त्या सहापैकी एकाचे निधन झालेले आहे.
आले कुठून, कुणी आणले?काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी या बनावट पत्राची चौकशी करण्याची मागणी केली. राजभवनातून अशा पद्धतीने बनावट पत्र जातात का?, असा प्रश्नही या निमित्ताने समोर आला आहे. हे पत्र आले कुठून, कुणी आणले आणि कोणत्या व्यक्तीने आणले याचा तपास होण्याची गरज आहे, असेही पटोले म्हणाले.
- राज्य मंत्रिमंडळाने शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या प्रत्येकी चार जणांची नावे राज्यपालांकडे आधीच मान्यतेसाठी पाठविली आहेत. मात्र, राज्यपालांनी अद्याप मान्यता दिलेली नाही. - १२ राजकीय नावांना राज्यपाल मान्यता देत नाहीत, हे लक्षात आल्याने आता महाविकास आघाडी सरकार सामाजिक व अन्य बिगर राजकीय क्षेत्रातील नवीन नावे पाठविणार असल्याच्या बातमीचीही मंगळवारी दिवसभर चर्चा होती.