मुंबई : घनकरचरा, वाहतूक, भ्रष्टाचार, दुष्काळ आदी महाराष्ट्रासमोरील विविध समस्यांच्या निराकरणासाठी, व्यासपीठावरून अभिनव संकल्पनांची मांडणी करणारे विद्यार्थी आणि समोर प्रेक्षकांमध्ये बसून विद्यार्थ्यांच्या भूमिकेत या संकल्पना समजून घेणारे, प्रसंगी अधिक माहिती विचारत, बदल सुचविणारे खुद्द राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असे अनोखे दृश्य सोमवारी वरळी येथील एनएससीआय सभागृहात पाहायला मिळाले. नव्या महाराष्ट्राच्या निर्मितीत युवावर्गाने सहभाग घ्यावा, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी राज्यासमोरील समस्यांचा अभ्यास करून त्यावर उपाययोजना सुचवाव्यात, यासाठी ‘अॅक्शन फॉर कलेक्टिव्ह ट्रान्स्फॉर्मेशन (एसीटी)’अंतर्गत ‘ट्रान्सफॉर्म महाराष्ट्र’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमांतर्गत राज्यभर एका स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यात सहा लाख विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवत, तब्बल २३०० संकल्पनांचे सादरीकरण केले. त्यातून विविध महाविद्यालयांच्या ११ संघांची अंतिम फेरीत निवड करण्यात आली. या ११ संघांनी महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व इतर मान्यवरांसमोर उपाययोजनांचे सादरीकरण केले.दुष्काळमुक्त महाराष्ट्र, वाहतूक व्यवस्थेचे एकात्मिकरण, नागरिकांचा प्रशासनातील सहभाग, घनकचरा व्यवस्थापन, नागरी गरिबी निर्मूलन, भ्रष्टाचार मुक्त महाराष्ट्र, नागरिकांचा प्रशासनात सहभाग, स्टार्टअप इंडिया, ग्रामीण भागातील जीवनस्तर उंचावण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर, जलद न्यायदानासाठी आधुनिक पद्धतींचा अवलंब आदी एकूण ११ विषयांवर सादरीकरण करण्यात आले. सर्व सादरीकरण निश्चितच चांगले होते. आज गौरविण्यात आलेले ११ संघ नवा महाराष्ट्र घडविण्यात निश्चितच योगदान देतील, त्याचा आम्हीही आमच्या कामकाजात वापर करणार आहोत, असे मुख्यमंत्री म्हणाले. अंमलबजावणीसाठी स्वतंत्र टीम‘ट्रान्सफॉर्म महाराष्ट्र’ या उपक्रमाच्या अंमलबजावणीसाठी स्वतंत्र टीम तयार करण्यात येईल. यात मंत्रिगटातील एक, मुख्यमंत्री सचिवालयातील संबंधित अधिकारी आदींचा समावेश असेल, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)रतन टाटांसारखे दुसरे नाहीचरतन टाटा यांच्यासारखा कुणी असू शकत नाही, ते एकमेव आहेत, असा गौरवपूर्ण उल्लेख करत, मुख्यमंत्री म्हणाले की, राजकारण आणि कापोर्रेट यांनी राष्ट्राला प्राधान्य देत, हातात हात घालून काम केले पाहिजे. आपण राष्ट्रासाठी काम करतोय, राष्ट्र प्रथम ही भावना लक्षात घेऊन परिवर्तनासाठी प्रयत्न करावे. रतन टाटा यांचे काम उल्लेखनीय असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. अक्षयकुमारची मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे मागणी जुन्या काळातील टेलिफोन बुथच्या धर्तीवर प्रत्येक पाचशे अथवा हजार मीटरच्या अंतरावर महिलांसाठी स्वच्छतागृहे उभारण्यात यावीत. शिवाय, जागोजागच्या स्वच्छतागृहांची माहिती नागरिकांना मिळावी, यासाठी विशेष अॅप विकसित करावे, अशी मागणी सुप्रसिद्ध अभिनेता अक्षयकुमार याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली. यावर लवकरच कार्यवाही करून राज्यातील स्वच्छतागृहे जिओ टॅगिंगवर आणण्यासाठी प्रयत्न करू, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले.या कार्यक्रमात अक्षयकुमार आणि ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. प्रश्नोत्तरादरम्यान अक्षयकुमारने विशेषत: महिलांसाठी स्वच्छतागृहे उभारण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले.
संपूर्ण विकास होईपर्यंत ‘ट्रान्सफॉर्म महाराष्ट्र’ सुरूच राहणार
By admin | Published: May 02, 2017 5:03 AM