नालासोपारा : राज्यसभा निवडणुकीत उभ्या असणाऱ्या उमेदवारांनी किंवा राजकीय पक्षांनी माझी तीन मते गृहीत धरू नये, असे बविआचे सर्वेसर्वा आमदार हितेंद्र ठाकूर यांनी ठणकावून सांगितले. १० जूनला अजून वेळ आहे. निवडणुकीत आम्हाला निवडून आणणाऱ्या कार्यकर्त्यांना विचारात घेऊन निर्णय जाहीर करीन, असेही त्यांनी सांगितले.
राज्यसभा निवडणुकीत सहा जागांसाठी सात उमेदवार उभे असल्याने चुरस निर्माण झाली आहे. यामुळे छोटे पक्ष आणि अपक्ष आमदारांच्या मतांना महत्त्व प्राप्त झाले आहे. ते म्हणाले, काही पक्षांनी बविआचा पाठिंबा मिळेल, असे गृहित धरलेले आहे. मात्र, माझ्या पक्षाचा किंवा तिन्ही आमदारांच्या पाठिंब्याबाबत पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व दोन्ही आमदारांसोबत बसून चर्चा करणार असल्याचे ठाकूर यांनी सांगितले. त्यानंतर निर्णय जाहीर करेन, तोपर्यंत कोणीही आमची तीन मते ग्राह्य धरू नका, असे ते म्हणाले. जे उमेदवार उभे आहेत, त्यांनीही संपर्क साधल्याचे ठाकूर यांनी सांगितले.