Reservation: ...तोपर्यंत आरक्षणाचा प्रश्न सुटणार नाही, काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांचं मोठं विधान
By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2023 09:46 PM2023-08-26T21:46:14+5:302023-08-26T21:48:06+5:30
Ashok Chavan's Big Statement on Reservation: राज्यातील मराठा आरक्षणासह ओबीसी आरक्षणाचा प्रश्न प्रलंबित आहे. दरम्यान, आरक्षणाच्या मुद्द्यावरून काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी राज्य सरकारवर घणाघाती टीका केली आहे.
राज्यातील मराठा आरक्षणासह ओबीसी आरक्षणाचा प्रश्न प्रलंबित आहे. दरम्यान, आरक्षणाच्या मुद्द्यावरून काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी राज्य सरकारवर घणाघाती टीका केली आहे. सरकारकडे ओबीसी, मराठा आरक्षणासंदर्भात कोणतेही धोरण नाही, असे अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे.
माजी मुख्यमंत्री आरक्षणाच्या प्रश्नावरून सरकारवर टीका करताना अशोक चव्हाण म्हणाले की, स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुका मागील दीड-दोन वर्षांपासून घेतल्या जात नाहीत. राज्यातील वातावरण सत्ताधारी पक्षाच्या विरोधात असून पराभवाच्या भीतीने निवडणुका घेतल्या जात नाहीत. विविध कारणे देऊन सरकार निवडणुका टाळत आहे. सरकारकडे ओबीसी, मराठा आरक्षणासंदर्भात कोणतेही धोरण नाही. केंद्र सरकार जोपर्यंत ५० टक्क्यांची मर्यादा दूर करत नाही तोपर्यंत आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागणार नाही. आरक्षण नसल्यामुळे नोकर भरती सुरु असतानाही मराठा समाजातील विद्यार्थ्यांना त्याचा लाभ मिळत नाही. सरकार केवळ बैठकांचे गाजर दाखवत आहे.
यावेळी काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात यांनी शेतीच्या प्रश्नावरून राज्य सरकारवर टीका केली. ते म्हणाले की, ऑगस्ट महिन्यात पावसाने दडी मारल्याने खरिपाचे पीक वाया गेले आहे. पिण्याची पाण्याची टंचाई व चाऱ्याची समस्या निर्माण झाली आहे. शेतकरी हवालदिल झाला आहे. लोक त्रस्त आहेत, पाण्याच्या टँकरची मागणी करत आहेत. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांचे दुष्काळाकडे लक्ष नाही अशा परिस्थितीत महाराष्ट्र शासन कुठे आहे ? असा प्रश्न पडला आहे. कांद्याचे भाव पडल्याने नाफेड मार्फत २४१० रुपयांने २ लाख टन कांदा खरेदी करण्याचा निर्णय केंद्र सरकारने जाहीर केला पण एकट्या नासिक जिल्ह्यातच १५ लाख टनांपेक्षा जास्त कांदा उत्पादन होते. कांदा खरेदी करण्यासाठी नाफेडने अत्यंत जाचक अटी घातलेल्या आहेत. कांद्याचा आकार, रंग, वास सुद्धा तपासला जाणार आहे. भाजपा सरकारकडून शेतकऱ्यांची अवहेलना सुरु आहे, अशी टीकाही थोरात यांनी केली.