बारामती - Ajit Pawar in Baramati ( Marathi News ) १९९१ ला खासदारकीला लेकाला म्हणजे मला निवडून दिलं, नंतर वडिलांना निवडून दिलं म्हणजे साहेबांना, त्यानंतर लेकीला ३ वेळा निवडून दिले म्हणजे सुप्रियाला, आता सुनेला निवडून द्या असं आवाहन बारामतीच्या जनतेला अजित पवारांनी केले आहे. सुनेत्रा पवार यांच्या प्रचारासाठी अजित पवारांनी बारामतीत सभा घेतली.
या सभेत अजित पवार म्हणाले की, बारामतीत जवळपास ९० टक्के कामे मी स्वत: पुढाकार घेऊन केली आहेत. परंतु सध्या काहींनी आता पुस्तकेत हे आम्हीच केले असं लिहिलंय. आताचे विद्यमान खासदार यांची पुस्तिका पाहिली त्यात नगरपालिकेची इमारत, ज्याला निधी मी दिला असं म्हणत अजित पवारांनी सुप्रिया सुळेंवर कामाचे श्रेय लाटत असल्याचा आरोप केला.
तसेच तुम्ही पहिल्यापासून पवारांच्या मागे उभे राहिलात, त्यामुळे जिथं पवार आडनाव असेल तिथे मतदान करायचं. त्यामुळे आपली परंपरा खंडित केली अशी भावना कुणाच्या मनात येणार नाही. ही निवडणूक देशाच्या भवितव्याची आहे. जागतिक पातळीवर मोदींनी देशाचं नाव वाढवण्याचा प्रयत्न केला हे त्रिवार सत्य आहे. मोदी दरदिवाळीला जवानांना प्रोत्साहन देत साजरी करतात असं कौतुक अजित पवारांनी नरेंद्र मोदींचं केले.
दरम्यान, बारामतीतून आमच्या विचारांचा माणूस निवडून दिला तर त्यातून विकास होणार आहे. याआधी फॉर्म भरल्यानंतर शेवटची एक सभा व्हायची. आता सगळीकडे का फिरावं लागतंय? ही वेळ का आणली, बारामतीच्या विकासासाठी, जिल्ह्यासाठी महाराष्ट्रासाठी करतोय. मी शिव शाहू फुले आंबेडकरांची विचारधारा सोडली नाही. अठरापगड जातीच्या लोकांसाठी काम करतोय असंही अजित पवारांनी म्हटलं.