मुंबई - माझ्यासह माझ्या मुलाला मूळासकट राजकारणातून उठवण्याचा प्रयत्न केला. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली पक्ष एकत्र व्हावा अशी कालपर्यंत माझी भूमिका होती. परंतु आता ती बदलली. आदित्य ठाकरेंची विधानं ऐकून माझे मत बदलले. गद्दार कोण? ही क्रांती, उठाव झाला त्याची जगभरात चर्चा झाली. बाळासाहेबांच्या विचारांची गद्दारी कुणी केली? याचं आत्मपरिक्षण करणार का? असा घणाघात रामदास कदम यांनी आदित्य ठाकरेंवर केला आहे.
रामदास कदम म्हणाले की, शिवसेनेत हे घडत असताना योगेशनं वर्षावर असताना सांगितले माझ्या वडिलांना फोन करून बोलवा तेव्हा काहीजणांनी गरज नाही असं सांगितले. सिद्धेशच्या मोबाईलवर वरूण सरदेसाईंचा फोन आला होता. उद्धव ठाकरेंनी राष्ट्रवादीला सोडावं असा निरोप दिला. परंतु उद्धव ठाकरेंची राष्ट्रवादीला सोडण्याची मानसिकता नाही असं मला सांगण्यात आले. तेव्हा यापुढे मला फोन करू नका असं म्हटलं. मी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला परंतु ते राष्ट्रवादीला, शरद पवारांना सोडण्यास तयार नव्हते असं त्यांनी सांगितले.
मोठी बातमी! रामदास कदम आणि राज ठाकरेंची फोनवरून चर्चा; लवकरच भेट होणार
तसेच पक्ष आपल्याला चालवायचा आहे. शरद पवार हे शिवसेना चालवणार नाही. शरद पवारांनी उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री बनवून जे साध्य करायचे ते केले. शिवसेना फोडायचं, संपवायचं काम शरद पवारांनी केले. कोकणात शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचे राष्ट्रवादीत प्रवेश करुन घेतले. मी याबाबत पत्र उद्धव ठाकरेंना दिले. परंतु त्याकडे दुर्लक्ष केले. मुख्यमंत्री आमचे, पैसा शासनाचा आणि शिवसेना फोडण्यासाठी निधीवाटप शरद पवारांनी केले असा आरोप रामदास कदमांनी केला.
मुंबईत मराठी टक्का कमी का झाला?२५ वर्ष मुंबई महापालिकेवर शिवसेनेची सत्ता आहे. २५ वर्षापूर्वी किती मराठी माणूस शिल्लक होता आणि आता किती आहे? मराठी टक्का कमी झाला. आम्ही मराठी माणसांसाठी काय केले? याचं उत्तर आमच्यासह द्यायला हवं. मराठी माणसांच्या हक्कासाठी लढणारी शिवसेना होती. महापालिकेच्या कामात आम्ही कधी हस्तक्षेप केला नाही असं सांगत अप्रत्यक्षपणे रामदास कदम यांनी ठाकरे कुटुंबावर भाष्य केले आहे.