डोंबिवली : शहरात होणाऱ्या ९०व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या बोधचिन्हाचे अनावरण मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मंत्रालयात झाले. संमेलनाची आयोजक संस्था असलेल्या आगरी यूथ फोरमने बोधचिन्हासाठी घेतलेल्या स्पर्धेतून सुमित म्हात्रे यांचे बोधचिन्ह निवडण्यात आले.साहित्य संमेलन स्मार्ट केले जाईल. त्यामुळे बोधचिन्हाचा अनावरण सोहळाही ‘सब कुछ बडा’ असेल. बोधचिन्ह अनावरणासाठी फडणवीस यांना डोंबिवलीत पाचारण केले जाईल, असे साहित्य संमेलनानिमित्त काही दिवसांपूर्वी घेतलेल्या वाचक मेळाव्यात स्वागताध्यक्ष व आगरी यूथ फोरमचे अध्यक्ष गुलाब वझे यांनी जाहीर केले होते. मात्र, फडणवीस यांच्या व्यस्त वेळापत्रकामुळे त्यांची वेळ मिळत नसल्याने मंगळवारी मंत्रालयात राज्यमंत्री व स्थानिक आमदार रवींद्र चव्हाण यांच्या पुढाकाराने बोधचिन्हाच्या अनावरणाचा कार्यक्रम झाला. या वेळी राज्यमंत्री चव्हाण, गुलाब वझे, साहित्यिक रविप्रकाश कुलकर्णी, साहित्य महामंडळाच्या सदस्या उषा तांबे, डॉ. उज्ज्वला मेहेंदळे, मसपाच्या डोंबिवलीशाखेचे उपाध्यक्ष सुरेश देशपांडे, आगरी युथ फोरमचे जालिंदरपाटील, पांडुरंग म्हात्रे, प्रभाकर चौधरी, रामकृष्ण पाटील, दत्ता वझे, प्रकाश भंडारी आदी मान्यवर उपस्थित होते. (प्रतिनिधी)
संमेलनाच्या बोधचिन्हाचे अनावरण
By admin | Published: November 16, 2016 5:52 AM