UP Election Result 2022 : आज पाचही राज्यांच्या निवडणुकांचे निकाल जाहीर होणार आहेत. सध्या पाचही राज्यांमध्ये मतमोजणी सुरू असून समोर येत असलेल्या कलांनुसार पंजाब वगळता सर्वच राज्यांमध्ये भाजपनं मुसंडी मारल्याचं चित्र दिसून येतंय. युपीतही भाजपनं मोठी मुसंडी मारली असून महाराष्ट्रातील भाजपच्या काही नेत्यांनीही यावर प्रतिक्रिया दिली आहे. यावर आता रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली असून युपीत भाजपला एकहाती सत्ता मिळाली तरी महाराष्ट्रातील नेत्यांना खुश होण्याचं कारण काय? असा सवाल त्यांनी केला आहे.
"युपीत भाजपला एकहाती सत्ता मिळाली तरी महाराष्ट्रातील नेत्यांना खुश होण्याचं कारण काय? तुम्ही महाराष्ट्राच्या हिताबद्दल विचार केला पाहिजे. तुम्ही जेव्हा महाराष्ट्रात सत्तेत होता, तेव्हा तुम्ही महाराष्ट्राची ताकद कमी करत होता. तेव्हा तुम्हाला महाराष्ट्राच्या अस्मितेचं काही पडलं नव्हतं का?," असा सवालही रोहित पवार यांनी केला.
"... तेव्हाही तुम्ही शांत बसला""महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी जे सेंटर महत्त्वाचं होतं, ज्यातून शिक्षित युवा पीढीला लाखापेक्षा जास्त नोकऱ्या मिळाल्या असत्या, त्या तुमच्या काळात गुजरातला गेल्या. डायमंड ट्रेडही मोठ्या प्रमाणात गुजरातला गेलं, शिपबिल्डिंग गुजरातला गेला तेव्हाही तुम्ही शांत बसला. मरीन पोलीस सेंटर जे पालघरला होणार होतं, तेही गुजरातला गेलं तेव्हाही शांत बसला, जेव्हा महाराष्ट्राची ताकद कमी केली जात होती, तेव्हा आंदोलन केलं गेलं नाही. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल बोलले तेव्हाही आंदोलन केलं नाही. कुठेतरी तुम्हाला तुमचं राजकीय हित आवश्यक आहे. महाराष्ट्राचं मुंबईचं महत्त्व कमी होत होतं तेव्हा तुम्ही शांत होता हेच महाराष्ट्रासाठी खरंतर अन्यायाची भूमिका आहे. भाजपनं या पाच सहा गोष्टी गेल्या पाच वर्षांत केल्या तर कदाचित मुंबईलाही केंद्रशासित प्रदेशही केलं असतं असा लोकांचं म्हणणं आहे. युपीत जे काही झालं तर महाराष्ट्रात बदल होईल असं वाटत असेल तर अशा प्रकारे तुलना करणं योग्य नाही," असंही ते म्हणाले.