ऑनलाइन लोकमतनागपूर, दि.06 - ‘सर्जिकल स्ट्राईक’च्या मुद्द्यावरुन देशातील राजकारण तापायला सुरुवात झाली असताना राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी ‘बॉम्बगोळा’ टाकला आहे. मोदी सरकारने उरी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी टाकलेल्या पावलाचे आम्ही स्वागतच करतो. मात्र त्याचा गवगवा करणे योग्य नाही. ‘संपुआ’ सरकारच्या काळात सैन्याने ४ वेळा पाकिस्तानच्या हद्दीत जाऊन हल्ले केले होते. परंतु त्याचा गवगवा करण्यात आला नव्हता, असे प्रतिपादन शरद पवार यांनी केले. नागपुरात राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या विभागीय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते.
उरी येथे सैन्यदलाच्या छावणीवर झालेल्या हल्ल्याने देशवासीयांचे मन हेलावून गेले. सर्वांनाच चीड आली होती व आता बदला घेतलाच पाहिजे ही देशाची भावना होती. एरवी केंद्र शासनाच्या विविध बाबींवर मी टीका करतो. परंतु दहशतवाद्यांची शिबीरे उध्वस्त करण्यासाठी पाकव्याप्त काश्मिरमध्ये ‘सर्जिकल स्ट्राईक’ करण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निर्णयाचे स्वागतच करतो. मात्र अशा संकटांना तोंड द्यायचे असते. कारवाई केल्यानंतर गवगवा करण्याची बाब खटकली आहे. देशाला एकसंघ ठेवणे ही राज्यकर्त्यांची पहिली जबाबदारी आहे, असे पवार म्हणाले.
देशाने एक व्हायला हवे
देशाच्या सुरक्षेशी संबंधित मुद्द्यांवर राजकारण व्हायला नको. निवडणूका येतात आणि जातात. परंतु देशाची सीमा अखंड आणि सुरक्षित रहायला हवी. देशावर संकट येत असेल तर संपूर्ण देशाने एकत्र व्हायला हवे. या मुद्द्यावर आम्ही सरकारच्या पाठीशी आहोत व कधीही राजकारण आणणार नाही, असे शरद पवार म्हणाले.