इंदापूर : राज्यातील सर्व आगामी निवडणुका काँग्रेस पक्ष ताकदीने लढवेल व जिंकेल, असा आत्मविश्वास माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी रविवारी (दि. १२) व्यक्त केला. ते येथील काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्ता मेळाव्यात बोलत होते. माजी आमदार उल्हास पवार या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी होते. विधानसभा निवडणुकीनंतर झालेला हा त्यांचा पहिलाच मेळावा होता. त्यामुळे गर्दी मोठ्या प्रमाणावर झाली होती. या वेळी चव्हाण यांनी आपल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर खरपूस टीका केली. ते म्हणाले की, राज्य व केंद्र सरकार गेल्या दोन वर्षांत सर्वच क्षेत्रात अपयशी ठरले आहे. राज्यातील दुष्काळाकडे त्यांनी साफ दुर्लक्ष केले आहे. केवळ जाहिरातबाजीच्या जोरावर सत्तेत आलेल्या भाजपा सरकारचे खरे रूप लोकांना दिसून आले आहे. जनता त्यांना कंटाळली आहे. आम्ही शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची मागणी केली, तर मुख्यमंत्री हट्टाने ती नाकारतात, असे सांगून ते म्हणाले की, शेतकऱ्यांना शासनाने संपूर्ण कर्जमाफी द्यावी. पुणे-मुंबई बुलेट ट्रेनला एक लाख कोटी रुपये निधी देण्याऐवजी तो निधी राज्यातील सिंचन प्रकल्पांना दिला जावा, अशी आमची मागणी आहे.मेळाव्याचे आयोजक माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील म्हणाले की, गेल्या दोन वर्षांत तालुक्यातील २२ गावांना खडकवासला, शेटफळ हवेली तलाव व नीरा डाव्या कालव्यातून पाणी मिळाले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना, उजनी धरण पाणलोट क्षेत्रात आठ तास वीजपुरवठा करण्याचा निर्णय त्यांनी केवळ दहा मिनिटांत घेतला होता. जिल्ह्यात काँग्रेस पक्षाला गतवैभव मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जातील. सेना-भाजपामधील संबंध पाहता, विधानसभेची मध्यावधी निवडणूक कधीही लागू शकेल, अशी परिस्थिती आहे, असे निरीक्षण त्यांनी नोंदविले. या वेळी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते डॉ. रत्नाकर महाजन, पुणे शहर काँग्रेसचे अध्यक्ष रमेश बागवे, जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष संजय जगताप, विलासराव वाघमोडे यांची भाषणे झाली. अॅड. कृष्णाजी यादव यांनी प्रास्ताविक केले. >एकच जागा : अडचणीची स्थितीहर्षवर्धन पाटील हे कार्यक्षम, अभ्यासू नेते आहेत. ते आमच्या समवेत असले पाहिजेत, यासाठी विधान परिषदेच्या जागावाटपात आपण त्यांच्यासाठी आग्रही होतो. मात्र, एकच जागा मिळाली. अडचण निर्माण झाली. तथापि, त्यांना आम्ही फार काळ बाहेर ठेवणार नाही, असे सूचक वक्तव्य चव्हाण यांनी केले.
आगामी निवडणुका ताकदीने लढणार
By admin | Published: June 13, 2016 1:46 AM