लोकमत न्यूज नेटवर्क, तासगाव (जि. सांगली) : तासगाव नगरपालिकेच्या नूतन इमारतीच्या उद्घाटन प्रसंगी सांगलीचे खासदार विशाल पाटील व माजी खासदार संजय पाटील हे भिडले. कार्यक्रमाच्या मंडपातच समोरासमोर येत तासगावमधील रिंगरोडच्या श्रेयवादावरून त्यांच्यात जोरदार वादावादी व खडाजंगी झाली. पालकमंत्री सुरेश खाडे यांच्या उपस्थितीतच हा वाद झाला.
खासदार विशाल पाटील यांनी भाषणात तासगावच्या रिंगरोडचे श्रेय शरद पवार गटाच्या आमदार सुमन पाटील आणि युवानेते रोहित पाटील यांना दिले. त्यांच्या वक्तव्याला माजी खासदार पाटील यांनी भाषणात जोरदार आक्षेप घेत विशाल पाटील यांच्यावर टीका केली. त्यावरून दोघांत समोरासमोर हातवारे करीत जोरदार वादावादी सुरू झाली. यावेळी कार्यकर्त्यांनी गदारोळ घातल्याने कार्यक्रमाच्या ठिकाणी तणाव निर्माण झाला होता.
अशी झाली शाब्दिक खडाजंगी...
संजय पाटील यांचे भाषण सुरू असतानाच विशाल पाटील यांनी त्यावर आक्षेप घेतला. मी भाषणात तुमचे नाव घेतले नाही, तुम्ही माझे नाव काढायचे कारण काय, असे खासदार पाटील यांनी म्हटल्यानंतर, संजय पाटील यांनी ‘ये बस खाली’ असे सुनावले. त्यानंतर दोन्ही दोघांमध्ये जोरदार शाब्दिक खडाजंगी सुरू झाली. भाजपचे काही कार्यकर्ते व्यासपीठावर धावून गेले. व्यासपीठावर मोठा गदारोळ माजला होता. नंतर भाजपच्याच काही पदाधिकाऱ्यांनी खासदार पाटील यांची समजूत घातली. त्यानंतर पुन्हा कार्यक्रम सुरू झाला.
रत्नागिरीत वक्फ कार्यालय उद्घाटनाला दाखवले काळे झेंडे
लोकमत न्यूज नेटवर्क, रत्नागिरी : रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांसाठीच्या वक्फ मंडळाच्या कार्यालयाचा सोमवारी रत्नागिरीत पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. यावेळी सकल हिंदू समाजातर्फे काळे झेंडे दाखवून निदर्शने करण्यात आली.
सहा महिन्यांपूर्वीच रत्नागिरीत वक्फ मंडळाचे कार्यालय सुरू झाले आहे. त्यातील अंतर्गत कामे आटोपल्यानंतर सोमवारी मंत्री सामंत यांच्या हस्ते त्याचे उद्घाटन करण्यात आले. आपण जाती-धर्माच्या पलीकडे जाऊन काम करत असल्याचे सांगतानाच मंत्री सामंत यांनी विरोधकांवर कडाडून टीका केली. लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी आणि संविधान या विषयावरून तुमच्या मनात विष पेरले गेले. ज्यांना तुम्ही मते दिलीत ते उद्धवसेना काँग्रेसचे लोक आहेत कोठे, असा प्रश्न त्यांनी केला.
हा कार्यक्रम करण्यास सकल हिंदू समाज संस्थेने विरोध केला होता. कार्यक्रम स्थळानजीक उपस्थित सकल हिंदू समाज कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवून पालकमंत्री सामंत यांच्याविरोधातही घोषणा दिल्या.
‘एकदा आम्ही गप्प बसलो, आता नाही...’
लोकमत न्यूज नेटवर्क, अमरावती : दर्यापूर विधानसभेची जागा शिंदेसेनेच्या हक्काची आहे, मात्र येथे काहीजण अडचणी निर्माण करीत आहेत. एकदा गप्प बसलो आता नाही, असा थेट इशारा शिंदेसेनेचे माजी आमदार अभिजित अडसूळ यांनी राणा दाम्पत्याला अप्रत्यक्षरीत्या देत महायुतीलाच आव्हान दिले आहे.
दर्यापुरात सोमवारी खासदार श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदेसेनेचा मेळावा होता. यावेळी अडसूळ म्हणाले, भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शाह यांच्या सांगण्यावरून आम्ही अमरावती लोकसभेची जागा भाजपला सोडली. मात्र, ती गमवावी लागली. आम्ही आधीच सांगत होतो, उमेदवाराला विरोध आहे, मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. आता दर्यापूरची जागा मुळीच सोडणार नाही.
‘बाहेरचे पार्सल खपवून घेतले जाणार नाही’
मेळघाट असो वा दर्यापूर, अचलपूर असो किंवा तिवसा. येथे केवळ कमळ चिन्हाचाच उमेदवार राहील. दर्यापूर मतदारसंघात बाहेरचे पार्सल खपवून घेतले जाणार नाही. स्थानिकांनाच भाजप उमेदवारी देईल आणि स्थानिकच उमेदवार निवडून येऊ शकतो, असा इशारा माजी खासदार नवनीत राणा यांनी अभिजित अडसूळ यांना अप्रत्यक्षपणे दिला आहे. कार्यकर्त्यांच्या बैठकीत त्या बोलत होत्या.
पक्ष निरीक्षकांसमोर भिडले काँग्रेसचे कार्यकर्ते; जालन्यातील प्रकार
लोकमत न्यूज नेटवर्क, जालना : विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यासाठी सोमवारी आलेल्या काँग्रेसच्या पक्षनिरीक्षक खासदार शोभा बच्छाव यांच्यासमोरच दोन गटांतील कार्यकर्ते एकमेकांना भिडले. पदाधिकाऱ्यांच्या मध्यस्थीनंतर अखेर गोंधळ शांत झाला.
सोमवारी जिल्ह्यातील पाचही विधानसभा मतदारसंघांसाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. प्रारंभी पदाधिकारी मुलाखतीची प्रक्रिया सांगत होते. त्याचवेळी इच्छुक उमेदवार अब्दुल हाफिज हे शक्तिप्रदर्शन करीत कार्यकर्त्यांसमवेत आले. त्यावेळी आमदार कैलास गोरंट्याल यांचे समर्थक आणि अब्दुल हाफिज यांच्या समर्थकांमध्ये शाब्दिक चकमक झाली आणि दोन्ही समर्थकांकडून घोषणाबाजी सुरू झाली. काही ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांनी समजूत काढल्यानंतर कार्यकर्ते शांत झाले.