नागपूर - न्यायव्यवस्थेची प्रतिष्ठा जपणे वकिलांचे पहिले कर्तव्य आहे. त्यांनी न्यायालयासंदर्भात समाजापर्यंत योग्य संदेश पोहोचविला पाहिजे. त्याकरिता न्यायालय व समाजामधील दुवा म्हणून कार्य करावे. पीडिताला न्याय देण्यासाठी न्यायालयाला सहकार्य करावे, असे आवाहन सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश डॉ. धनंजय चंद्रचूड यांनी शुक्रवारी हायकोर्ट बार असोसिएशन नागपूरच्या शताब्दी वर्ष समारंभात केले.
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठातील परिसरामध्ये आयोजित या समारंभाचे सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी सर्वोच्च न्यायालयाचे वरिष्ठ न्यायमूर्ती भूषण गवई, न्यायमूर्ती अभय ओक, न्यायमूर्ती प्रसन्न वराळे, माजी सरन्यायाधीश शरद बोबडे, मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती देवेंद्रकुमार उपाध्याय, नागपूर खंडपीठाचे प्रशासकीय न्यायमूर्ती नितीन सांबरे, राज्याचे महाधिवक्ता ॲड. बिरेंद्र सराफ सन्माननीय अतिथी म्हणून तर, संघटनेचे अध्यक्ष ॲड. अतुल पांडे व सचिव ॲड. अमोल जलतारे व्यासपीठावर उपस्थित होते.
न्यायालयांनी जाहीर केलेले निर्णय सार्वजनिक मालमत्ता होतात. त्यानंतर निर्णयांची प्रशंसा होऊ शकते किंवा टोकाचा विरोधही केला जाऊ शकतो. न्यायालयांनी विरोध पचविण्याची तयारी ठेवली पाहिजे. परंतु, बरेचदा वकीलही न्यायालयाच्या निर्णयावर टीका करतात. न्यायप्रविष्ट प्रकरणांवरसुद्धा भाष्य करतात. ही प्रथा चुकीची आहे, याकडे सरन्यायाधीशांनी लक्ष वेधले. वकिली व्यवसायामध्ये महिलांचा सहभाग वाढत असल्यामुळे आनंद आहे; परंतु, बार कौन्सिल व बार असोसिएशनच्या निवडणुका लढण्यासाठी महिला वकील मोठ्या संख्येत पुढे येत नसल्यामुळे खंतही त्यांनी व्यक्त केली.
नागपूरमधील आठवणींना दिला उजाळासरन्यायाधीश चंद्रचूड यांनी नागपूरमधील आठवणींना उजाळाही दिला. नागपूर खंडपीठामध्ये न्यायमूर्ती म्हणून कार्य करतानाचे दिवस खूप आनंदात गेले. तसेच, वकिली करीत असताना ज्येष्ठ विधिज्ञ भाऊसाहेब बोबडे व व्ही. आर. मनोहर यांच्याकडून खूप काही शिकायला मिळाले. नागपूरच्या वकिलांची देशभरात प्रतिष्ठा आहे, असे त्यांनी सांगितले.
नागपूर बारने सर्वोच्च व उच्च न्यायालयाला प्रतिभावंत न्यायमूर्ती दिले. सर्वांनी सर्वोत्तम कार्य करून नागपूरची प्रतिष्ठा वाढविली.- न्या. भूषण गवईनागपूरचे वकील प्रतिभावंत व धाडसी आहेत. बार असोसिएशनच्या विविध उपक्रमांमुळे वकिलांची चांगली जडणघडण होते. ही परंपरा पुढेही कायम राहील.- न्या. शरद बोबडेविधी व्यवसाय महान असून त्याचा कोठेही अवमान होणार नाही, यासाठी सतत प्रयत्न केले पाहिजे. वकील हा न्यायदान प्रक्रियेतील महत्त्वाचा घटक आहे. त्यांनी नैतिकता जपणे आवश्यक आहे.- न्या. देवेंद्रकुमार उपाध्यायनागपूर बार असोशिएशनचा सदस्य असल्याचा गर्व आहे. १०० वर्षे पूर्ण केलेल्या या असोसिएशनच्या सहकार्यामुळेच नागपूर खंडपीठामध्ये सर्वांत कमी प्रकरणे प्रलंबित आहेत.- न्या. नितीन सांबरे