kashmira kishor sankhe । मुंबई: केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) नागरी सेवा परीक्षा २०२२ चा निकाल आज म्हणजेच मंगळवारी जाहीर केला. दिल्लीच्या इशिता किशोरने देशात पहिला क्रमांक पटकावला आहे, तर ठाण्याच्या कश्मिरा संखे हिने राज्यात पहिला क्रमांक मिळवला. कश्मिरा संखे हिचा देशात २५वा क्रमांक आला आहे. देशात ५४ वा क्रमांक पटकावणारी ऋचा कुलकर्णी राज्यात दुसऱ्या क्रमांकाची मानकरी ठरली आहे.
राज्यात पहिला क्रमांक मिळवल्यानंतर कश्मिरा संखेने आनंद साजरा केला. एवढं मोठं यश मिळेल याची अपेक्षा नव्हती, पण यावेळी करायचंच असा आत्मविश्वास बाळगला होता. निकाल लागल्यानंतर सुरूवातीला विश्वास बसला नाही पण नंतर २५वा क्रमांक पाहून समाधान वाटल्याचे कश्मिराने सांगितले. ती एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलत होती. व्यवसाय सांभाळत मिळवले यश तसेच लहानपणापासूनच यूपीएससी करायची आवड होती. आईने वर्तमनापत्र दाखवली, त्यातून शिकत गेले, असे कश्मिराने सांगितले. लक्षणीय बाब म्हणजे कश्मिरा ही स्वत: एक डॉक्टर असून डेंटिस्ट आहे. तिने डॉक्टरचा व्यवसाय सांभाळून हे यश मिळवले. आरोग्य क्षेत्रात राहून देखील लोकांची सेवा करता येते पण प्रशासकीय सेवेच्या माध्यमातून अधिक लोकांपर्यंत पोहचता येत असल्याचे तिने यावेळी सांगितले. राज्यात प्रथम आलेल्या कश्मिरा संखेचे आयएएस अधिकारी होण्याचे ध्येय आहे.
"मला यशाची पूर्ण खात्री होती", UPSC 2022 ची 'टॉपर' इशिता किशोरचं IAS बनण्याचं स्वप्न
IAS बनण्याचे ध्येय - कश्मिरा २०२० पासून यूपीएससीची परीक्षा देत असलेल्या कश्मिराला तिसऱ्या प्रयत्नात यश मिळाले. विशेष बाब म्हणजे पहिल्या दोन प्रयत्नात तिला प्रिलिम्स परीक्षा देखील क्लिअर झाली नव्हती. मात्र, जिद्दीच्या जोरावर ठाण्याच्या या लेकिनं तिसऱ्या प्रयत्नात प्रिलिम्स, मेन्स परीक्षेसह मुलाखतीचाही गड सर केला. आपल्या या यशाचं श्रेय कश्मिराने आपल्या आईवडलांना दिले असून भविष्यात नागरिकांची सेवा करणार असल्याचे म्हटले आहे.