ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २३ - शाळांमध्ये लैंगिक शिक्षणाचे धडे देण्यास सरकारकडून दिरंगाई केली जात असली तरी देशातील मुलांमध्यै लैंगिक संबंधांचे आकर्षण वाढत असल्याचे दिसते. देशातील शहरी भागातील मुलं वयाच्या १४ वर्षीच पहिल्यांदा सेक्स करत असल्याचे एका पाहणीतून समोर आले असून यामुळे अल्पवयीन मुलांमध्ये लैंगिक आजारांचे प्रमाणही वाढले आहे. गेल्या ४ वर्षांत अल्पवयीन मुलांमधील लैंगिक आजारांचे प्रमाण ४.९ टक्क्यानी वाढल्याचे उघड झाले आहे.
एका संस्थेने देशभरातील ८ मेट्रो सिटी व १२ शहरांमध्ये १३ ते १९ वर्ष या वयोगटातील १५ हजार मुलांमध्ये सर्वेक्षण केले आहे. या सर्वेक्षणात ८.९ टक्के मुलांनी एकदा लैंगिक आजार झाल्याची कबुली दिली. मुलांमध्ये सरासरी वयाच्या १४ व्या वर्षी तर मुलींनी १६ वर्षी पहिल्यांदा शरीर संबंध ठेवल्याचे मान्य केले. अल्पवयीन मुला-मुलींमधील लैंगिक आजारांचे वाढते प्रमाण ही चिंताजनक बाब असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. ५७ टक्के मुलामुलींनी लैंगिक संबंधाविषयीची माहिती इंटरनेटवरुन जाणून घेतल्याचे सांगितले. भारतात सेक्सविषयी कमालीचा न्यूनगंड असून अल्पवयीन मुलांना याविषयी योग्य पद्धतीने माहिती दिली जात नसल्याने लैंगिक संबंधांतून होणा-या आजारांचे प्रमाण वाढत आहे असे तज्ज्ञांनी म्हटले आहे.