- अविनाश कोळीसांगली : आधुनिकतेचे पंख लावून सिमेंटच्या जंगलांत विहार करणारी शहरे निसर्गाच्या सान्निध्यात विहार करणा-या पक्ष्यांसाठी घुसमट निर्माण करणारी ठरत आहेत. त्यामुळे चिऊ-काऊंसह अन्य पक्ष्यांची ठिकाणेही बदलत आहेत. नैसर्गिक नाले आणि ओतांमधील अतिक्रमणांनीही पक्ष्यांचा राबता घटल्याचेच दिसत आहे.
शहरीकरणाचे पक्षीजीवनातील नकारात्मक चित्र दिसत असताना, काही सकारात्मक गोष्टीही समोर येत आहेत. प्रत्येक घराभोवती बाग करण्याची वाढलेली धडपड, टेरेस गार्डनकडे वाढलेला कल अशा गोष्टींमुळे पक्ष्यांचे शहरातील वास्तव्य कमी झाले असले तरीही अजून दिसत आहे. विनावापर पडून राहिलेल्या मोकळ््या भूखंडांवर पसलेल्या झाडाझुडपांमुळेही पक्ष्यांना आसरा मिळत आहे. सकारात्मक गोष्टींचा विचार करून शहरीकरणातील चुकीच्या गोष्टींकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. पक्ष्यांचा किलबिलाट वाढविण्यासाठी सर्वच स्तरावर प्रयत्नांची गरज आहे.
सांगलीतील पक्षीतज्ज्ञ शरद आपटे यांनी सांगितले की, जिल्ह्यात २०० हून अधिक जातीचे पक्षी आहेत. सांगली, मिरज, कुपवाड महापालिका क्षेत्रातच जवळपास ११० प्रकारचे पक्षी आढळून येतात. याठिकाणी काही पक्ष्यांची संख्या घटलेली दिसत असतानाच, काही पक्ष्यांचा विस्तारही वाढलेला दिसून येत आहे. जमिनीवर वाढणा-या पक्ष्यांची संख्या घटत असल्याचे प्रकर्षाने दिसून येते. यामध्ये माळढोक, पाखोर्ड्या, भोरड्या, टिटवी, तनमोर अशा प्रकारच्या पक्ष्यांचा समावेश आहे. पक्ष्यांचे हे विश्व अधिक विस्तारता यावे आणि जपता यावे यासाठी सर्वच घटकांनी प्रयत्न करण्याची गरज आहे.
या पक्ष्यांचा राबता वाढलापांढ-या भुवईचा बुलबुल पूर्वी दंडोबाच्या डोंगरावर दिसून यायचा. आता तो सर्वत्र दिसून येतो. स्वर्गीय नर्तक (पॅराडाईज प्लायकेचर) हासुद्धा आता विलिंग्डन महाविद्यालय, आमराई, हरिपूर रोड अशा सर्वच ठिकाणी दिसून येत आहे. हुदहुद पक्षीही सर्वत्र दिसून येतो.
या पक्ष्यांची संख्या घटलीमाळरानावरची टिटवी, सुतारपक्षी, धाविक, पाखोर्डा, भोरड्या, निखार या पक्ष्यांची संख्या घटत असल्याचे चित्र आहे. पूर्वी कुपवाडमधील माळरानावर धाविक व माळरानावरची टिटवी दिसत होती. औद्योगिक क्षेत्र विस्तारत गेले आणि त्यांची संख्या घटली. सांगलीतील घुबडांची संख्याही कमी झाली आहे.
पक्षी दिन का साजरा करतात?जगप्रसिद्ध पक्षीतज्ज्ञ डॉ. सलीम अली यांचा १२ नोव्हेंबर हा जन्मदिवस राष्ट्रीय पक्षी दिवस म्हणून साजरा केला जातो. भारत सरकारने याबाबतची घोषणा केली होती. पोस्ट विभागाने त्यांच्या सन्मानार्थ पोस्ट तिकीटही प्रसिद्ध केले होते. सलीम अली यांनी पक्ष्यांबाबत अनेक पुस्तके लिहिली. यामध्ये ‘बर्डस् आॅफ इंडिया’ हे पुस्तक सर्वाधिक लोकप्रिय ठरले.
नाले, ओत यांच्यातील अस्तित्व धोक्यातनैसर्गिक नाले आणि ओतांमधील अतिक्रमणे पक्ष्यांच्या अस्तित्वावर घाला घालणारे ठरत आहेत. सांगलीतील जवळपास ८ नैसर्गिक ओत पूर्वी पाणी व दलदलीने व्यापलेले होते. त्यामुळे याठिकाणी नेहमीच पक्ष्यांचा राबता होता. पक्षीप्रेमींसाठी ही ठिकाणे अत्यंत महत्त्वाची होती. आता याठिकाणी मोठ्या प्रमाणावर अतिक्रमणे झाल्याने पक्ष्यांवर संक्रांत आली आहे.
कृष्णेच्या कुशीत पक्षीजिल्ह्यातील २०० पक्ष्यांच्या जातींपैकी ११० जाती महापालिका क्षेत्रात असल्याने आश्चर्य व्यक्त होते. शहरीकरण वाढताना पक्ष्यांचे मोठे अस्तित्व या क्षेत्रात कसे, याबाबत प्रश्न उपस्थित होतो. याला कृष्णा नदीचे पाणलोट क्षेत्र कारणीभूत आहे. ११० जातींपैकी ४० जातींचे पक्षी हे कृष्णा नदीच्या कुशीतच दिसतात. त्यामुळे नदीपात्राने पक्ष्यांचे अस्तित्व टिकवून ठेवल्याचे दिसते. शरद आपटे यांनी सांगितले की, काही ठिकाणी शेतात आम्हाला कृषी औषधांच्या फवारणीने पक्षी मेल्याचे दिसून आले. प्रदूषणाने त्यांच्यावर कितपत परिणाम होत आहे, याचा अभ्यास करण्याची गरज आहे. त्याबाबतचा स्पष्ट निष्कर्ष आता काढता येणार नाही.