- मनीषा म्हात्रे, मुंबई
तुम्ही गव्हर्नर पद सोडा... नाहीतर तुमच्यासह तुमच्या कुटूंबियांना जीवे ठार मारू अशी भारतीय रिझर्व्ह बँकेचे (आरबीआय) गर्व्हनर उर्जित पटेल यांना धमकी देणाऱ्या वैभव बद्दलवार (३४) याला सायबर सेल पोलिसांनी शुक्रवारी अटक केली. उच्चशिक्षित असतानाही आधीच नोकरी नाही. त्यात नोटबंदीच्या निर्णयामुळे सारेच मार्ग बंद पडले. या रागातून वैभवने हे पाउल उचल्याचे समोर आले आहे. मुंबईत आमदारांचे धमकी प्रकरण गाजत असतानाच पटेल यांच्या ईमेलवर २३ फेब्रुवारी रोजी बद्दलवारने धमकीचा मेल पाठविला होता. त्यात तुमच्यासह तुमच्या कुटुंबीयांना जिवे मारण्यात येईल, अशी धमकी त्याने दिली होती. पटेल यांनी ही बाब रिझर्व्ह बँकेच्या फोर्ट येथील केंद्रीय कार्यालयात महाव्यवस्थापक वैभव चतुर्वेदी यांच्या कानावर घातली.सायबर सेलचे पोलीस उपायुक्त अखिलेश सिंग यांच्याशी संपर्क साधून चतुर्वेदी यांनी हा मेल त्यांना पाठवत लेखी तक्रार दिली. या तक्रारीवरून भादंवि कलम ५०६ (२) अन्वये गुन्हा दाखल करून सायबर सेल पोलिसांनी तपास सुरू केला. नागपूरमधील एका सायबर कॅफेमधून मेल पाठविल्याचे स्पष्ट होताच, पोलिसांनी नागपूरमधून आरोपी बद्दलवारला ताब्यात घेतले. त्याने हा मेल पाठविल्याची कबुली देताच पोलिसांनी त्याला अटक केली. न्यायालयाने त्याला ६ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. तरुणांच्या रोजगाराबाबत विचार करण्याऐवजी नको ते निर्बंध लादून जनतेची पिळवणूक होत असल्याच्या रागातून वैभवने थेट गव्हर्नरलाच धमकीचा मेसेज दिल्याचे तपासात समोर आले.उच्चशिक्षित असतानाही बेरोजगार असल्यामुळे आरोपी तणावात होता. यातूनच त्याने हे पाऊल उचलल्याचे प्राथमिक तपासात समोर आले. याप्रकरणी आरोपीकडे अधिक तपास सुरु असल्याची माहिती’ सायबर सेलचे पोलीस उपायुक्त अखिलेश सिंग यांनी दिली.