ऑनलाइन लोकमतसातारा, दि. 15- संपूर्ण महाराष्ट्र दुष्काळाने होरपळतोय. माण तालुक्यातील अनेक भागांमध्ये महिलांना घागरभर पाण्यासाठी पायपीट करावी लागतेय. अशावेळी रविवारी उरमोडी कालव्याला पुसेगाव-वडूज रस्त्यावरील वाकेश्वर फाट्यानजीक मोठे भगदाड पडले. ऐन दुष्काळात लाखो लिटर पाणी अक्षरश: वाया गेले.यंदाच्या उन्हाळ्यात प्रथमच माण तालुक्यात पाणी आले. मात्र, काही मूठभर लोकांचा करंटेपणा अन प्रशासनाचा नाकर्तेपणा यामुळे पुसेगाव-वडूज रस्त्यावरील वाकेश्वर फाट्याजवळून माण तालुक्यात गेलेल्या उरमोडी कालव्याला रविवारी भले मोठे भगदाड पडले. त्यामुळे पाण्याचे लोट अक्षरश: रस्त्यावरून वाहू लागले. त्यानंतर जवळच असलेल्या ओढ्यात शिरले. पाण्याला वेग प्रचंड असल्याने ओढ्यावरील सर्व बंधारेही काही तासांतच वाहू लागले़. ओढ्यातील पाणी पुढे येरळा नदीत गेले़ 'कालव्यातील पाणी एके ठिकाणी सिमेंटच्या मोठ्या जलवाहिनीतून पुढे जाते; पण सिमेंटच्या नळीच्या तोंडाला वाहून आलेल्या झाडाची झुडपे, कचरा मोठ्या प्रमाणात साठल्याने मागे पाण्याच्या फुगवटा वाढत गेला. त्यामुळे प्रचंड दाब तयार झाला परिणामी मोठे भगदाड पडले,' अशी माहिती परिसरातील शेतक-यांनी दिली. मात्र,काही मुठभर मंडळींनी हा कालवा फोडल्याची दबकी चर्चा दिवसभर सुरू होती.वरिष्ठ अधिकारीही ठाण मांडून !कालव्याचे भगदाड बुजवून पाणी पुन्हा प्रवाहित करण्यासाठी उरमोडी प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता वाय. आर. दाभाडे यांच्यासह अनेक अधिकारी-कर्मचारी दिवसभर घटनास्थळी ठाण मांडून होते. ब-याच तासांच्या कष्टानंतर हा कालवा सुरळीत करण्यात या पथकाला यश आले. मात्र, तोपर्यंत लाखो लिटर पाणी वाहून गेले होते.
उरमोडी कालव्याला भगदाड, लाखो लिटर पाणी वाया
By admin | Published: May 15, 2016 10:32 PM