लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : ब्रॅन्डन गोन्सालवीस (२२) या तरुणाच्या मोबाइलचे ‘लॉक’ उघडण्यासाठी, आरे पोलिसांनी एका अमेरिकन कंपनीची मदत घेतली आहे. आरेमध्ये शीर धडावेगळे केलेल्या अवस्थेत त्याचा मृतदेह सापडला होता. त्यामुळे त्याच्या मोबाइलमार्फत पोलीस त्याच्या मारेकऱ्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत. डिसेंबरमध्ये ब्रॅन्डनची हत्या झाल्यानंतर, पोलिसांनी त्याच्या हत्येप्रकरणी सर्व अनुषंगाने चौकशी केली. मात्र, त्यांना काहीच सुगावा लागला नाही. त्यामुळे त्याच्या मोबाइलमधून काही हाती लागते का? याचा प्रयत्न पोलिसांनी सुरू केला. ब्रॅन्डनच्या मोबाइल सीडीआरमध्ये तो ज्यांच्या संपर्कात होता, त्यांचीही चौकशी पोलिसांनी केली. मात्र, त्याचा मोबाइल लॉक असल्याने, तो सोशल नेटवर्क साइटवर कोणाच्या संपर्कात होता, या दिशेनेही पोलिसांना तपास करायचा आहे. फेब्रुवारी महिन्यात आरे पोलिसांनी न्याय वैद्यकीय प्रयोगशाळेत हा मोबाइल पाठवला होता. मात्र, योग्य ती यंत्रणा आणि सॉफ्टवेअर त्यांच्याकडे नसल्याने, हा मोबाइल प्रयोगशाळेने परत पाठविला, तसेच पोलिसांनीच मोबाइलचे लॉक उघडून देण्याची विनंती त्यांनी केली. त्यानंतर, एका अमेरिकन कंपनीकडून ब्रॅन्डनच्या मोबाइलचे लॉक उघडण्यात पोलिसांना यश आले आहे. त्यानंतर, पुन्हा तो मोबाइल प्रयोगशाळेत पाठविण्यात आला आहे. तथापि, मोबाइलमधील डेटा अद्याप प्रयोगशाळेकडून प्राप्त झालेला नसल्याचे, आरे पोलीस ठाण्याच्या एका अधिकाऱ्याने सांगितले. आरेच्या युनिट क्रमांक ३२मध्ये २१ डिसेंबर २०१६ रोजी ब्रॅन्डनचा मृतदेह सापडला होता. त्याच्या दोन दिवस आधी तो घरातून गायब झाला होता. गोरेगाव पूर्वच्या ओबेरॉय मॉलशेजारी असलेल्या पद्मावती को-आॅप हाउसिंग सोसायटीत तो राहत होता.
मोबाइल ‘लॉक’ उघडण्यासाठी अमेरिकन कंपनीची मदत
By admin | Published: July 12, 2017 5:27 AM