मुंबई : दोन देशांतील संबंध सुधारण्यासाठी विविध उपक्रम आंतरराष्ट्रीय पातळीवर राबविले जातात. अमेरिकन आणि भारतीय नागरिकांनी एकत्र येऊन विचारांची, माहितीची देवाण-घेवाण करावी यासाठी एक व्यासपीठ तयार करण्यात आले. यानिमित्ताने वांद्रे-कुर्ला संकुलात यूएस कौन्सुलेटमध्ये ‘दोस्ती हाऊस’ सुरू करणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. दोन्ही देशांतील व्यक्तींना एकत्र येण्यासाठी पूर्वी ज्या ठिकाणी अमेरिकन लायब्ररी होती त्या ठिकाणी हे ‘दोस्ती हाऊस’ तयार करण्यात आले आहे. या ठिकाणी काही बदल करून तयार करण्यात आलेल्या या हाऊसमध्ये दोन्ही देशांतील नागरिक एकत्र येऊन शिकू शकतात, कला सादर करू शकतात. या पद्धतीने अमेरिकेने १६९ देशांत अशाप्रकारे ७०० जागा निर्माण केलेल्या आहेत. त्याच धरतीवर हे हाऊस उभारण्यात आले आहे. या हाऊसमध्ये एक व्हिडीओ वॉल तयार करण्यात आली आहे. या ठिकाणी एक स्टेजही उभारण्यात आले असून एका वेळी १०० व्यक्ती येथे कार्यक्रमाला उपस्थित राहू शकतात. इनहाऊस गेम त्याचबरोबरीने विविध संकल्पनांवर आधारित कार्यक्रम आखण्यात आले आहेत. हाऊसमध्ये महत्त्वाची एक बाब म्हणजे लायब्ररी तयार करण्यात आली आहे. ‘ट्रॅडिशनल लायब्ररी’त १० हजार पुस्तके, ७०० चित्रपट आणि १३० पिरीआॅडिकल्स उपलब्ध आहेत. या जागेत काही संस्थांचे विद्यार्थी एकत्र भेटू शकतात. त्याचप्रमाणे येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करू शकतात. या हाऊसमध्ये अभ्यासक अभ्यासासाठी येऊ शकतात. त्याचबरोबरीने कलाकारही येऊ एकत्र येऊ शकतात. दोन्ही देशांची संस्कृती - कला येथे एकत्र येऊ शकतात, असे डेप्युटी प्रिन्सिपल आॅफिसर जेनिफर लार्सन यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
अमेरिका-भारताचे ‘दोस्ती हाऊस’
By admin | Published: September 24, 2016 1:48 AM