मुंबई : राज्यात सर्वत्र मुबलक पाऊस झाला, धरणसाठे भरले म्हणून भरमसाट पाणी वापरणार असाल तर वेळीच सावध व्हा... कारण, दरमाणशी मर्यादेपेक्षा अधिक पाण्याचा वापर केल्यास तुम्हाला व्यावसायिक दराने पाणीपट्टी भरावीे लागू शकते. महाराष्ट्र जलसंपत्ती नियामक प्राधिकरण याबाबतची अधिसूचना लवकरच काढणार आहे.पाण्याचा भरमसाट वापर थांबविण्यासाठी जलसंपत्ती नियामक प्राधिकरणाने धोरणात्मक निर्णय घेतला आहे. सध्या असलेली पाणी वापराची दरमाणशी मर्यादा वाढवून दिली जाणार असली तरी, त्यापेक्षा अधिक वापर झाल्यास व्यावसायिक दर लावण्यात येणार आहे.मुंबई महापालिकेमार्फत सध्या दरमाणशी १३५ लीटर इतके पाणी पुरविले जाते. ते १६५ लीटर इतके करण्यात येणार आहे. मात्र १७५ पेक्षा अधिकच्या वापरासाठी व्यावसायिक दराने पाणीपट्टी ग्राहकांकडून आकारली जाणार आहे. अन्य महापालिकांमध्ये पाण्याचा दरमाणशी १३५ लीटर इतका कोटा असतो. तो आता दरमाणशी १५० लीटर इतका करण्यात येणार आहे. ग्रामपंचायतींमध्ये सध्याच्या दरमाणशी ४० लीटरऐवजी ५५ लीटर पाणी पुरविले जाईल. नगरपालिकांमधील कोटा मात्र माणशी ७० ते १२५ लीटर इतकाच कायम ठेवण्यात येणार आहे. महापालिका, नगरपालिका आणि ग्रामपंचायतींमधील पाणी ग्राहकांनी त्यांना ठरवून दिलेल्या कोट्यापेक्षा १० टक्के जादा पाणी वापरले तर सामान्य पाणीपट्टी आकारली जाईल. त्यापेक्षा अधिकच्या पाण्यासाठी व्यावसायिक दराने पाणीपट्टी स्थानिक स्वराज्य संस्थांकडून आकारली जाईल.ठरवून दिलेल्या पाणीकोट्याची मर्यादा ओलांडणाºया ग्राहकांकडून व्यावसायिक दर आकारणी करण्यास स्थानिक स्वराज्य संस्थांना आदेश देण्याचे अधिकार जलसंपत्ती प्राधिकरणाकडे आहेत, असे सूत्रांनी स्पष्ट केले. श्रीमंतांच्या सोसायट्या, बंगल्यांमध्ये हजारो लीटर पाणी वापरले जाते, पण त्यासाठी त्यांना जादा दर सध्या द्यावा लागत नाही.महाराष्ट्र हे औद्योगिकदृष्ट्या देशात अग्रेसर राज्य आहे. पण एकूण वापरातील पाण्यापैकी अधिकृत केवळ तीन टक्केच पाणी उद्योग वापरतात. प्रचंड पाणीवापर करणारे उद्योग हे अवैधरीत्या पाणी घेऊन पाणीपट्टी चुकवतात, याची आकडेवारीच जलसंपत्ती नियामक प्राधिकरणाकडे आली आहे. हा अवैध पाणीवापर रोखण्यासाठी कठोर उपाययोजना करण्यात येणार आहेत. याशिवाय, पिण्याच्या पाण्याचा वापर बांधकामांपासून विविध कारणांसाठी करणाºया टँकर लॉबीला चाप बसविण्यासाठी नवीन नियमही करण्यात येणार आहेत, असे प्राधिकरणाच्या वरिष्ठ अधिकाºयांनी सांगितले.मिनरल वॉटरच्या नावाखालची पाणीचोरी रोखणारराज्यात आज अनेक गावे अशी आहेत की तेथे पिण्याच्या पाण्याची टंचाई आहे. पण मिनरल वॉटरचे कारखाने बिनबोभाट सुरू आहेत. त्यांच्याकडील पाणीवाटपाचे कोणतेही आॅडिट केले जात नाही. मिनरल वॉटरच्या नावाखाली गावातील पाणीसाठ्यातून अवैधरीत्या/ चोरून आणलेले पाणी जुजबी तुरटी वगैरे टाकून बॉटलबंद केले जाते आणि ते विकले जाते. या पार्श्वभूमीवर, आता पाण्याच्या बॉटलवर त्यातील पाण्याचा स्रोत काय ते नमूद करावे लागणार आहे. शिवाय, पाणी शुद्ध करण्यासाठीच्या प्रक्रियेचा उल्लेखही करणे अनिवार्य असेल.
पाणी ‘मोजून’ वापरा! जादा वापरल्यास व्यावसायिक दर, मात्र कोटाही वाढवून देणार
By यदू जोशी | Published: September 16, 2017 5:15 AM